Breaking News

मनसेचा राज्य सरकारला अल्टिमेटम, 'सोमवारपर्यंत वीज बिल माफ करा अन्यथा...'

 

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांना वाढीव वीज देयके (Electricity bill) वीज कंपन्यांकडून देण्यात आले. या वीज बिलात सवलत देण्यात येणार असल्याचं राज्य सरकार (Maharashtra Government)कडून सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर या निर्णयावरुन राज्य सरकारने यू टर्न घेत वाढीव वीज बिल भरावे लागेल असे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटलं. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेने (Maharashtra Navnirman Sena)ने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला एक अल्टिमेटम दिला आहे.

मनसेचा राज्य सरकारला अल्टिमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, वाढीव वीज बिलाबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निर्णय घेतला की आम्ही कोणत्याही प्रकारे वीज बिलात सवलत देऊ शकत नाही. ही महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे, विश्वासघात आहे. तुमच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं? मनसेतर्फे आम्ही सरकारला अल्टिमेटम देत आहोत की, सरकारकडून या संदर्भात सोमवारपर्यंत जर याबाबत निर्णय घेतला नाही तर मनसेकडून जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल. उग्र आंदोलन करण्यात येईल आणि पक्षातर्फे राज्यातील जनतेला मोर्चात सहभागी होण्याची विनंती करतो.

सर्वसामान्यांची वीज कापली तर...

जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कापायला आले तर मनसे सैनिक तुमच्यासोबत राहतील. आमच्या मनसैनिकांच्या हातून काही प्रकार घडला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील. एका बाजुला तुम्ही मंत्र्यांची बिल माफ करता आणि सर्वसामान्यांची वीज कापणार असाल तर मनसे तुमचं सुद्धा कनेक्शन कापल्याशिवाय राहणार नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यानंतर शरद पवारांनी सांगितलं होतं की राज्य सरकारसोबत बोलतो. मात्र, आता मला वाटतं पवार साहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत नाहीये. आता कॅबिनेटची मिटिंग होणार आहे त्यामध्ये पवार साहेब तुमचा आदेश द्या आणि नागरिकांची वीज बिल माफ करा अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.