समीर कुरेशी/दुसरबीड/प्रतिनिधि : साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा नको एक ही हात, जो '...
समीर कुरेशी/दुसरबीड/प्रतिनिधि :
साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा
उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा
नको एक ही हात, जो 'पाटी'ला पारखा
शाळेशी परिचय व्हावा आईसारखा
या ओळींची आज खात्री पटल्याची अनुभूती देणारा ज्ञानाचा दीपोत्सव ताडशिवणी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वांच्या पुढाकारातून यावर्षीची दिवाळी शाळेत साजरी करण्याचे ठरले. विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी शेकडो दीप प्रज्वलित करून खऱ्याअर्थाने अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या शाळेत दीपोत्सव साजरा केला.
गावातील तरुणांच्या पुढाकारामुळे शाळेचे रुपडे पालटले आहे. ही शाळा डिजिटल बनविण्यात आली असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. सर्वधर्मीयांचे खरे प्रार्थनास्थळ असणारी शाळा तेजोमय करण्यासाठी दीपावलीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच दिव्यांची आरास करून शाळा लख्ख प्रकाशाने उजळली आणि तिमिर गडप झाला.
जिल्हा परिषदेच्या शाळा नेहमीच दुर्लक्षित राहिल्या आहेत. शिक्षकवर्गही उदासीन धोरण ठेवत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला आहे. मात्र, आता शासनाने लक्ष घालून या शाळा डिजिटल बनविण्याचे धोरण आखले आहे. शिक्षणाचे महत्त्व समजल्याने गावकरीही पुढाकार घेऊन शाळांसाठी मदत करत आहेत. शैक्षणिक परिवर्तनाची पताका इतरही शाळांमध्ये फडकावी असे कार्य ग्रामस्थांच्या मदतीने ताडशिवणीच्या शाळेत सुरू आहे. ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी शाळा आली पाहिजे आणि शैक्षणिक प्रगतितूनच प्रत्येकाचा विकास होऊ शकतो हेच बिंबविण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे संयोजकांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे...
सुर्ये आधिष्ठीली प्राची
जगा जाणिव दे प्रकाशाची
तैसी श्रोतया ज्ञानाची
दिवाळी करी
याच उदात्त हेतूने गावातील युवक जे नोकरीनिमित्त शहरात होते ते लॉकडाऊनमुळे गावी परतले. त्यांनी गावातील दर्शनी भिंतीवर दात्यांच्या सहकार्याने शैक्षणिक चार्ट रंगवून घेतले. सुविचार आणि बोध घेण्यासारखा मजकूर लिहून भिंती बोलक्या केल्या. गणिताची प्राथमिक संकल्पना, इतिहासातील ठळक घटना व घडामोडी, मराठी आणि इंग्रजी विषयातील दररोजच्या वापरातील माहितीचे संकलन करण्यात आले आहे. यातून गावात शैक्षणिक परिवर्तनाची नवीन वाट खुली झाली आणि गावकऱ्यांची पावले शाळेकडे वळली.
*... अन् भिंती झाल्या बोलक्या*
कोरोनाच्या काळात बंद असलेल्या शाळेचे रूप पूर्णपणे बदलण्याचा संकल्प करून तो पूर्ण करण्यात आला. उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर आणि इतर मान्यवरांनी भरीव मदत या तरुणांकडे जमा केली आणि सुरू झाला बोलक्या भिंतींचा अभिनव ज्ञानरचनावादी बदल. शाळेतील वर्गांच्या समोरील भिंतीवर आधुनिक यंत्रांच्या साह्याने तालुक्यातील कलावंत मनोज राठोड यांच्या कुंचल्यातून सुंदर चित्रे आणि योगेश खरात यांच्याद्वारे गावातील भिंतीवर ज्ञानमय माहिती साकारण्यात आली.