Breaking News

अर्णव गोस्वामींचा जेलमधील मुक्काम वाढला

- हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाहीच!

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मोठा झटका मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. जवळपास 6 तासांची दीर्घ सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी याचिकाकर्ते सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

अर्णव गोस्वामी यांना आज जामीन मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. हायकोर्टात आज सकाळपासून युक्तीवाद सुरु होता. मात्र, हायकोर्टाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच जामिनासाठी अलिबाग सेशन कोर्टातही याचिका करता येईल. अशी याचिका केल्यास त्यावर 4 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशानंतर अर्णव यांना आजची रात्रदेखील क्वारंटाईन जेलमध्ये काढावी लागणार आहे. याबाबत आता पुढील सुनावणी सोमवारी (9 नोव्हेंबर) होणार आहे.