सध्याच्या काळात अनेक जण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असतात. त्यामुळे कधीही पैसे जवळ ठेवण्याची फारशी गरज भासत नाही. विशेष म्हणजे पैसे लागल्यास आप...
सध्याच्या काळात अनेक जण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असतात. त्यामुळे कधीही पैसे जवळ ठेवण्याची फारशी गरज भासत नाही. विशेष म्हणजे पैसे लागल्यास आपण आपल्या जवळील ATMमध्ये जाऊन तात्काळ पैसे काढू शकतो. पण, जर तुम्ही आता एटीएममधून पैसे काढत असाल तर जरा सावधान. कारण एटीएममधून चक्क पिन क्रमांक चोरला जात असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अलर्ट देखील दिला आहे. याचा एक व्हिडिओ मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केला आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.
कॅश काढण्यासाठी बऱ्याचदा एटीएमच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. या गडबडीत बऱ्याचदा लोकांची फसवणूक देखील होते. त्यातच सायबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे. तर अनेकदा एटीएममधून पैसे काढल्यानंतर अचानक ग्राहकांचे बँक खाते निकामी होते, अशा अनेक घटना घडल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, हे हॅकर्स तुमचा पिन कसा चोरतात, हे आता समोर आले आहे.
हॅकर्स कसा चोरतो पिन?
मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस अधिकारी एटीएम मशीनसमोर उभे आहेत. यात आपल्या पिन कोडवर हॅकर्स कसे लक्ष ठेवून असतात हे सांगण्यात आले आहे. बहुतेक कोणत्याही एटीएम मशीनमध्ये स्लॉट असतो, ज्यात आपल्याला आपले कार्ड टाकावे लागते. यानंतर, आपण स्क्रीन पाहताना आपला ४ किंवा ६ अंकी पिन टाकावा लागतो. इथेच हॅकर्स आपला प्लॅन करतात. ज्या स्लॉटमध्ये तुम्ही कार्ड टाकता, चोर त्याचवर एक आपला स्लॉट तयार करतात. ज्याचे कनेक्शन कॅमेऱ्याशी जोडलेले असते. हा कॅमेरा एटीएमच्या की पॅडच्या अगदी वर असतो. म्हणजेच या कॅमेऱ्यात तुम्ही टाकलेला कोड दिसून येतो. याद्वारे चोर कार्डसह सर्व माहिती कॅमेर्यामध्ये कॅप्चर करतात आणि हॅकर्स पिन चोरतात.