Breaking News

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात !

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात !
------------------

      कोरोनाच्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागला यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या  शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर तर मोठाच प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. या काळात मोठ्या शहरात क्लास लावून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सर्व सोडून घरी आपल्या गावी परतावे लागले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा पुन्हा एकदा  अनिश्चित काळासाठी पुढे ढकली. परिणामी या भावी अधिकाऱ्यांचे अभ्यासाचे नियोजन कोलमडले आहे. आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनमध्ये मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. एमपीएससीकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अभ्यासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवस महत्त्वाचा असताना स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला या काळाचा सामना करावा लागत आहे.  
   अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातून मुबंई, पुणे नाशिक , औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर, या सारख्या शहरामध्ये अभ्यास करण्यासाठी येत असतात. त्या ठिकाणी  होस्टेल मध्ये राहतात गरिबीशी झगडत अभ्यास करतात. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना हा एक वेगळेच संकट बनून  आला आणि त्यांच्या अभ्यासाच्या तयारी मध्ये व्यत्य  बनला. कोरोनामुळे विद्यार्थी वर्गाचा सगळ्यात मोठा  तोटा झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतो आहे. परंतु सध्याची परिस्थिती त्यासाठी पोषक नाही.
 परंतु आता राज्य शासनाने सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यसेवेच्या २०० पदे तर पीएसआय एसटीआय व असिस्टंट पदाच्या ८१० जागांसाठी तारखा जाहीर केल्या होत्या पण त्या कोरनाच्याच कारणामुळे अनिश्चित काळासाठी आता पुढे ढकलल्या आहेत. मागील चार महिन्यांच्या लॉकडाऊन काळात बहुतांश विद्यार्थी त्यांचा अभ्यास थांबला होता परंतु काही ॲक्टिव्ह स्पर्धा अभ्यास केंद्रांनी ऑनलाइनच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांशी कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवली होती. कोरोनाचा मोठा फटका विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा केंद्र या दोन्ही घटकांना बसला होता. सर्वच विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शना शिवाय लॉकडाऊन मध्ये घरीच अभ्यास करत होते. परंतु  या  नाकारात्मक वातावरणामुळे अनेक विद्यार्थी हे अधिकारी बनण्याचे आपल्या स्वप्न बाजूला ठेऊन आता वेगळा विचार करत आहेत. शासनाने सुमारे एक हजार दहा जागां साठी परीक्षा जाहीर करून एक अर्थी दिलासाच दिला आहे. परंतु परीक्षा पुढे ढकलून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी शासन खेळत आहे का? 
  त्यातच महाराष्ट्रातील कोणत्याच विद्यार्थी संघटना या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शासना बरोबर भांडताना दिसत नाहीत. याला महाराष्ट्रात सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार कारणीभूत आहे. हा सर्व प्रकार सुरू असतानाच आता स्पर्धा परीक्षा ही आरक्षणाच्या लढ्यात गुंतली नाही तर बरे. आता जर आरक्षणाच्या लढ्यात स्पर्धा परीक्षा  गुंतली तर अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार आहे.  दुसऱ्या बाजूला नोकर भरती करायची नाही कारण, कोरोनामुळे राज्य सरकारची आर्थिक हलाखी चाललेली आहे असे सांगितले जाते.  त्यामुळे महाविकास आघाडीचा मेगा भरतीचा फुगा फुटतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. सरकारकडून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी कोणतेच ठोस पाऊल उचलले जात नाहीत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे. मागील सरकाने मेगा भरतीच्या नावाखाली महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, महावितरण, जलसंपदा,  औद्योगिक विकास महामंडळ  या विभागांसाठी अनेक विविध पदाचे  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी  अर्ज मागवले होते. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून  दहा लाखा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागातून आपले उमेदवारी अर्ज भरले होते व त्यांच्याकडून  ऑनलाइन परीक्षा फी घेण्यात आली होती. या गोष्टीला आता दोन वर्षे होऊनही त्याचे पुढे काय झाले हे सत्तेवर असलेले सरकारही सांगायला तयार नाही. सत्तेवरील सरकाने तर स्पर्धा परीक्षा हा त्यांच्या प्रचाराचा मुद्दाच बनवला होता. त्यामुळे कुठे तरी शासकीय पातळीवर आता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार होणे गरजेचे आहे.  नाहीतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठी  शैक्षणिक नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी हा पूर्णतः अडचणीत सापडला असून त्याच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी सरकारने आता योग्य ती कडक पावले वेळेवर उचलणे गरजेचे आहे.  सध्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील युवकांवर ओढवलेले  बेरोजगारीचे संकट दूर करण्यासाठी अनेक विद्यार्थी आपल्याला शासकीय नोकरी मिळवी म्हणून एमपीएससी सरळसेवा सारख्या स्पर्धा परीक्षांकडे पहात आहेत.  त्यामुळे  महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मोठा विद्यार्थी वर्ग या स्पर्धा परीक्षांच्या  चक्रव्यूहातमध्ये अडकलेला आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अशा पद्धतीने जर संकटांचा सामना करावा लागला आणि शासनही विद्यार्थ्यांच्या जीवाशी असे खेळत राहिले. तर विद्यार्थ्यांना भविष्यकाळात मोठ्या बेरोजगारीचा हीच सामना करावा लागेल त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारकडे झुकेल जाईल. त्या साठी योग्य पाऊले उचलून शासनाने   विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा.