सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील राजवाडा परिसरात भरणारी चौपाटी त्याच परिसरात असणार्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील मोकळ्या जागेत स्थलांत...
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील राजवाडा परिसरात भरणारी चौपाटी त्याच परिसरात असणार्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याच्या हालचाली सातारा नगरपालिकेने सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानंतर त्या जागेत भराव घालून त्या ठिकाणचे सपाटीकरण करण्याचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनपूर्वी राजवाडा परिसरात असणारी चौपाटी बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, तसेच सातारा पालिकेने दिले होते. त्यानुसार या ठिकाणचे खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे बंद करण्यात आले. तेंव्हापासून गेल्या आठ महिन्यापासून चौपाटीवरील नाष्टाच्या गाड्यांचा व्यवसाय बंद आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया केंद्र व राज्य शासनाने नुकतीच सुरू केल्यानंतर चौपाटी सुरू करण्याची परवानगी व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व पालिकेकडे केली होती. व्यावसासिकांनी मागणी करूनही चौपाटी सुरू करण्याबाबतचे आदेश होत नसल्याने चौपाटीवरील व्यावसायिक अडचणीत आले होते. याबाबत व्यावसायिकांनी सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. या पाठपुराव्यानंतर नगराध्यक्ष माधवी कदम व तत्कालीन उपाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे यांनी या मागणीची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. त्यांनी चौपाटीसाठी पर्यायी जागा देता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार राजवाडा परिसरात असणार्या पशुवैद्यकीय दवाखान्यालगतच्या मोकळ्या जागेचा पर्याय पुढे आला. या जागेवर पूर्वी परळी, आसनगाव, तसेच कास भागांतून येणार्या माल आणि प्रवासी वाहनांसाठीचा तळ करण्यात आला होता. या जागेवरच चौपाटी स्थलांतरित करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या असून, जागेच्या सपाटीकरण नुकतेच पूर्ण झाले.
दरम्यान, राजवाड्यासमोर भरणारी चौपाटी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यालगतच्या आठ गुंठे जागेचा पर्याय पालिकेने निवडला आहे. या जागेचे सपाटीकरण करण्यात आले असून, त्याठिकाणी किती गाडे बसतील आणि किती जागा प्रत्येक गाडीला द्यायची, याचा अभ्यास सध्या सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांच्या संमतीने लवकरच होईल, अशी माहिती पालिकेचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे यांनी दिली.