- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पंढरपूर/ प्रतिनिधी विठ्ठल मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून वीणेकरी म्हणून पहारा ...
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी
विठ्ठल मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून वीणेकरी म्हणून पहारा देणारे कवडुजी नारायण भोयर (वय 64 ) व त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर (वय 55) या दाम्पत्याला कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान मिळाला आहे. गुरुवारी पहाटे कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचेवेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून भोयर दाम्पत्य उपस्थित राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक ही महापूजा होणार आहे.
विठ्ठल मंदिरातील एकूण सहा वीणेकर्यांमधून चिठ्ठी टाकून ही निवड करण्यात आली. भोयर दाम्पत्य हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. यंदा कार्तिकी यात्रेवेळी देखील वारकर्यांना मंदिरात प्रवेश नसल्याने आषाढी एकदाशीप्रमाणेच मंदिरातील वीणेकर्यांमधून चिठ्ठी टाकून कवडुजी भोयर यांची निवड करण्यात आली. कवडुजी भोयर हे मूळचे डौलापूर (पो. मोझरी, शेकापूर, तालुका हिंगणघाट, जि. वर्धा) येथील रहिवासी असून, गेल्या 10 वर्षांपासून पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ते वीणेकरी म्हणून पहारा देत आहेत. ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय माळकरी आहेत. मागील आठ महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळातदेखील ते मंदिरात पूर्णवेळ सेवा करीत आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराची नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या 9 गावामध्ये ही नाकाबंदी असणार आहे. कार्तिकी यात्रा गावोगावी साजरी करण्याचे सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा मानस आहे.
------------------------