नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, पुलावरुन वाकून पाहताना बघ्याचा पडून मृत्यू नांदेड : नांदेडमध्ये युवकाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्य...
नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, पुलावरुन वाकून पाहताना बघ्याचा पडून मृत्यू
नांदेड : नांदेडमध्ये युवकाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खेदाची गोष्ट म्हणजे हे वृत्त समजल्यानंतर पुलावरुन वाकून पाहताना तोल जाऊन आणखी एका तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nanded Man commits suicide in river man dies while watching from bridge)
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बेल्लूर भागात शनिवारी हा धक्कादायक प्रकार घडला. वीस वर्षीय प्रवीण खंदारेने कंदाकुर्ती गोदावरी नदीच्या पुलावरुन नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. प्रवीणच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली. हैदराबादमध्ये राहणारा प्रवीण लॉकडाऊनच्या काळात गावी आल्याची माहिती आहे, मात्र नोकरी नसल्याने प्रवीणने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
दरम्यान, प्रवीणच्या मृत्यूचं वृत्त वाऱ्यासारखं गावात पसरलं. नदीत उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. गावी आलेले 35 वर्षीय परशराम जाधव नदीच्या पुलावर ही घटना पाहण्यासाठी गेले. पुलावरुन वाकून पाहत असताना अचानक परशराम यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. पोहता न आल्यामुळे परशराम जाधव यांचाही नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाला.
प्रवीण खंदारे आणि परशराम जाधव या दोघांचेही मृतदेह नदीबाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही घटना शनिवारी सकाळी घडल्या. दोन तरुणांच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये वृद्धाची आत्महत्या
पिंपरी चिंचवडमधील रहाटणी परिसरात 68 वर्षीय वृद्धाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. मयत सुनील रानडे यांचा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय होता. कर्जबाजारी झाल्यानंतर परतफेड करता न आल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली
पैशांची मागणी करायला लोक सातत्याने घरी येत असल्याने ते नव्याने भाड्याचं घर शोधत होते. हेच घर शोधायला आलेल्या इमारतीवरुन उडी घेत त्यांनी आत्महत्या केली.