Breaking News

वीजबिलांबाबत मनसेचा सरकारला ‘अल्टिमेटम’

 सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा उग्र आंदोलन
- मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा इशारा


मुंबई/ प्रतिनिधी

वीजबिल माफी देता येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना असून, सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकार्‍यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने हे बील कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदने दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला. त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून, जनतेत संतापाची भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर वीजबिल माफ नाही केले नाही तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलने होतील. लोकांचा संयम सुटला आहे. पब्लिक क्राय झाल्यास त्याला जबाबदार सरकारच असेल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. तसेच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मनसेच्या आंदोलनात भाजपचीही उडी!

मनसेच्या या आंदोलनाला भाजपनेदेखील पाठिंबा दिला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, नांदगावकर यांनी हा प्रश्‍न सर्वांचाच आहे. त्यामुळे या आंदोलनात कुणीही येऊ शकतो. भाजपच काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीही या आंदोलनात सहभागी होऊ शकते. त्यांनाही वाढीव वीजबिल आलेच आहे, असे ते म्हणाले. तसेच भाजप-मनसे युतीबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा विषय माझ्या अख्त्यारीत येत नाही, असे सांगून या प्रश्‍नावर बोलणे त्यांनी टाळले. दरम्यान, मनसेच्या आंदोलनात भाजपही त्यांच्यासोबत राहील, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेत वेगळीच खिचडी शिजत तर नाही ना, या चर्चांना उधाण आले होते.