Breaking News

आयात कांदा मुंबईत दाखल

- कांद्याच्या किमती घसरल्या

- नवीन लाल कांद्याची आवकही वाढली


नाशिक/ प्रतिनिधी

आयात केलेला परदेशी कांदा मुंबईत दाखल झाला असून, नवीन लाल कांद्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण दिसून आली. सर्वसाधारण बाजारभावात प्रतिक्विंटल मागे 1200 रुपयांची तर कमाल बाजारभावात 891 रुपयांची घसरण झाली आहे. अचानक एका दिवसात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. परदेशी कांदा मुंबईत आला आहे, तसेच देशांतर्गत बाजार समित्यांमध्येदेखील लाल कांद्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत 450 वाहनातून 5100 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला प्रतिक्विंटल कमाल 5300 रुपये, सर्वसाधारण 4100 रुपये तर किमान 1500 रुपये इतका बाजारभाव मिळाला, त्यामुळे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सर्वसाधारण बाजारभावात 1200 रुपयांची, तसेच कमाल बाजारभावात 891 रुपयांची प्रतिक्विंटलमागे घसरण झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा, असा प्रश्‍न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांद्याला बाजारभाव मिळणे गरजेचे असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

---------------------