Breaking News

अर्णब गोस्वामींना अटक

 मराठी उद्योगपती अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण भोवले

- रायगड पोलिसांची मुंबईत कारवाई

- अलिबागला न्यायालयात केले हजर 


अलिबाग/ विशेष प्रतिनिधी

अलिबाग येथील उद्योजक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना अटक केली. मुंबईतील राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना अलिबागला येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

अन्वय नाईक हे कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अर्णब गोस्वामींसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. तसेच, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बंद करण्यात आलेले हे प्रकरण न्यायालयीन आदेशानंतर पुन्हा उघडण्यात आले होते. त्यानुसार रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करुन बुधवारी अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे.

--

अर्णव गोस्वामींचे पोलिसांवर मारहाण केल्याचे आरोप; 
न्यायालयाचे पुन्हा वैद्यकीय तपासणीचे आदेश!


पोलिसांनी अटक केल्यानंतर अर्णव गोस्वामी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांसमोर गोस्वामी यांनी पोलिसांवर मारहाण केल्याचे आरोप केले. त्यामुळे न्यायालयाने गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. अर्णव गोस्वामींना मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास अलिबाग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दीड तास चौकशी केल्यानंतर गोस्वामी यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अर्णव गोस्वामी याने न्यायाधीशांसमोर पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजपचा पोपट पिंजर्‍यात अडकला; शिवसेनेचा टोला!

मुंबई: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. गोस्वामी यांच्या अटेकवर ‘भाजपचा पोपट पिंजर्‍यात अडकला’ अशी खोचक टीका परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली. तर अर्णव गोस्वामी यांच्या अटेकाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध व्यक्त केला. पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली असून, कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेते असे काही ओरडत आहेत, जसे की तो भाजपचाच कार्यकर्ता आहे, असा खोचक टोला अनिल परब यांनी भाजपला लगावला. ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही. राज्य सरकारचा या प्रकरणाशी संबंध नाही. नाईक कुटुंबीय कोर्टात गेले आणि त्यांना तपासाची परवानगी मिळाली, असे अनिल परब म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य, महाराष्ट्र पोलिसांचे आभार!

मुंबई : अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासह नावे लिहिली आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आणि आजीने आत्महत्या केली. आजच्या दिवसासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्र पोलिसांनी यापुढे निःपक्ष तपास करावा. आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त न्याय हवा आहे, अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी दिली. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. माझ्या वडिलांनी आणि आजीने 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितीश सारडा या तिघांची नावे आहेत. अर्णब गोस्वामी यांच्यामुळेच अन्वय नाईक यांना त्यांच्या कामाची उर्वरित रक्कम मिळाली नाही. ती रक्कम दिली असती तर ते आज जीवंत असते, असे अक्षता नाईक यांनी सांगितले. तर आज्ञा नाईक यांच्या माहितीनुसार, अर्णब गोस्वामी सातत्याने माझ्या वडिलांना धमकी देत होते, तुला पैसे कसे मिळतात तेच पाहतो. तुझ्या मुलीचे करिअर उद्ध्वस्त करतो, अशी धमकी दिली होती.