Breaking News

अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाला काटवन खंडोबा रस्त्याचा विसर

अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाला काटवन खंडोबा रस्त्याचा विसर
------------
रस्त्याप्रश्नी नागरिकांच्या तक्रारी; आंदोलनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
----------------
खड्ड्याचे शहर म्हणून अहमदनगरची ओळख कधी पुसणार ?


गणेश जगदाळे/अहमदनगर :
अहमदनगर शहरातील काटवन खंडोबा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अतिशय अरुंद असून रस्त्यावर अतिक्रमण ही झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच पाऊसामुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. रस्त्याने नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या परिसरातील संजयनगर, गाजीनगर, जाधवमळा, महानगरपालिकेची घरकुल असलेली महात्मा फुले नागरी वसाहत येथे आठ ते दहा हजाराची लोकवस्ती असून. तरीही महापालिका प्रशासनाने काटवन खंडोबा रस्त्याकडे सरळ डोळेझाक केली आहे का? त्या परिसरातील नागरिकांनी वारंवार निवेदने व आंदोलने करूनही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. लोकमंथन'शी नागरिकांनी रस्त्याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. महापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा नगरसेवकांना विसर पडल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. शहरातील काटवन खंडोबा रोड हा आता वर्दळीचा रस्ता झाला आहे. सीना नदीच्या पुलावरून ते संजयनगर झोपडपट्टी ते आगरकर मळा पर्यंत हा रस्ता जातो.


दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले. त्यानंतर इथे रस्ताच झाला नाही. सध्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सीना नदीच्या पुलावरही खड्डे पडलेले आहेत. अनेक वेळा फुटलेल्या जलवाहिन्यांमधील पाणी रस्त्यावर आलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चिखल झालेला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत असल्याने रस्ता खराब झाला आहे. रात्रीच्यावेळी तर या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे़. खराब रस्त्यामुळे येथे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे़. नागरिकांना आता काटवन खंडोबा रस्ता आता खड्ड्यामध्ये शोधावा लागत आहे. महापालिका निवडणुकीत अनेकांनी आश्वासने दिली, मात्र रस्त्याचे काम झाले नाही, राजकीय पुढारी येतात आणि केवळ आश्वासने देऊन जातात प्रत्यक्षात पाठपुरावा कुणाकडूनही होत नाही़ आणि रस्त्याच्या प्रश्नाचे नेहमीच राजकारण करतात असे येथील नागरिक सांगतात.
अहमदनगर महानगरपालिका काटवन खंडोबा रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लावणार की नागरिकांच्या जीवाशी असाच खेळ सुरू राहणार हा येणारा काळच ठरवेल.
रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने आम्हाला रिक्षा चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. काटवन खंडोबा रस्त्याची पावसाळ्यामध्ये परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रास्ताचा प्रश्न सोडवावा.
--------------
वसीम शेख(स्थानिक नागरिक)