लोणंद येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात प्रतिपादन लोणंद / वार्ताहर : गेल्या दहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये पदवीधरांचे आणि शिक्षकांच...
लोणंद येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात प्रतिपादन
लोणंद / वार्ताहर : गेल्या दहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये पदवीधरांचे आणि शिक्षकांचे प्रश्न अजिबात सुटलेले नाहीत. पदवीधरांचे काय प्रश्न आहेत तर त्यांना रोजगार पाहिजे. पदवीधर झाल्यानंतर त्याच्या पुढील भवितव्य काय? जर राज्याची, देशाची अर्थव्यवस्था जर वेगाने विकसित होत असेल नवीन कारखाने, कंपन्या, ऑफिस उघडली जात असतील तर त्या लोकांना नोकर्या मिळतील. पण मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो र्हास होत चाललेला आहे. जी अधोगती चाललेली आहे. सगळी अर्थव्यवस्था घरसटलेली आहे. अर्थव्यवस्थेचा विकास दर घसरत चाललेला असेल तर त्याचा परिणाम कंपन्या, कारखाने आणि रोजगारावर होतो. पदवीधर लोकांच्या समोर अंधकारमय भविष्य आहे. पदवीधरांचा एकमेव प्रश्न आहे की आपल्या शिक्षणाचं पुढं काय करायचं? भारतीय जनता पार्टीने अर्थव्यवस्थेचे वाटोळं करून टाकलंय.
अशी टीका माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केलेली आहे. ते महाविकास आघाडी पुरस्कृत पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ लोणंद, ता. खंडाळा येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यातील कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सह गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे ते शिक्षकांच्या प्रश्नावर म्हणाले की, विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या पगाराचा विषय आहे. अनेक शिक्षक दहा दहा वर्षे विना पगारी काम करत आहेत. काहीतरी मार्ग आपल्याला काढावा लागेल. त्यांना सन्मानाने जगता आणि शिकविता येईल, नवीन पिढी तयार करता येईल. गेल्या पाच वर्षात हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रश्नांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आमदार त्यांच्या मागे उभे राहतील. सरकार आमचं आहे. हे प्रश्न सोडवायाचे असतील तर हे सरकारच सोडविणार आहे. शिक्षक व पदवीधर यांच्या पुढे काही आशादायी चित्र उभे करायचे असेल तर महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून दिले पाहिजे.
या मेळाव्या प्रसंगी सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ऍड. बाळासाहेब बागवान, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उदयसिंह उंडाळकर-पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, राजेंद्र शेलार, पंचायत समिती उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य दीपाली साळुंखे, ज्येष्ठ नेते एस. वाय. पवार, जिल्हा सेवादलाचे प्रमुख चंद्रकांत ढमाळ, नगरपंचायत विरोधी पक्ष नेते राजेंद्र डोईफोडे, गटनेते नगरसेवक हणमंतराव शेळके, नगरसेवक सुभाषराव घाडगे, माजी सभापती विनोद क्षीरसागर, कॉंग्रेस तालुकाध्यक्षा नगरसेविका शैलजा खरात, नगरसेविका स्वाती भंडलकर, नगरसेविका दिपाली क्षीरसागर, रमेश कर्णवर, माजी उपसरपंच दादासाहेब शेळके-पाटील, मार्केट कमिटी माजी सभापती शिवाजीराव शेळके, म्हस्कूअण्णा शेळके, सागर शेळके, ऋषिकेश धायगुडे-पाटील, प्रकाश गाढवे, रवींद्र क्षीरसागर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, दशरथ जाधव, पवन सूर्यवंशी, सुभाष कोळेकर, संतोष बावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षक व पदवीधर मतदार उपस्थित होते.