राज्यातील ठाकरे सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला...
राज्यातील ठाकरे सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व सोयीचं नाही. आमचं हिंदुत्व आमच्या धमन्यांमध्ये भिनलेलं आहे.
हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का? असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपवर पलटवार केला आहे. ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’मध्ये दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. राज्यातील आणि देशातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करतानाच विरोधकांना त्यांनी या मुलाखतीतून फैलावर घेतलं.
राज्यपाल कोश्यारी यांनी मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी पत्रं लिहून राज्यपालांवर टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर तुम्ही हिंदुत्व सोडलंय का?, असा सवाल राज्यपाल आणि भाजपकडून केला जातोय. त्यावर तुमची काय भूमिका आहे?, असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर, हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लगावला.
मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतंय.
राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही, असं सांगतानाच मग हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे काय? त्याने कोरोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. पहिलं या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व. आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, असा इशारा त्यांनी दिला.
आम्ही कधीच सोयीचं हिंदुत्व घेतलं नाही. जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, जनतेच्या हिताचं असेल ते कर. मग ते आपल्याला गैरसोयीचं असलं तरी जनतेसाठी कर! राजकारणासाठी तुम्ही हिंदुत्व नका घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.