Breaking News

जालना - विजेचा शॉक लागून आते-मामेभाऊ विहिरीत पडले, दोघांचाही बुडून मृत्यू

 

जालना - विजेचा शॉक लागून आते-मामेभाऊ विहिरीत पडले, दोघांचाही बुडून मृत्यू

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी येथे शेतात पाणी भरण्यासाठी विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन 18 वर्षीय आते-मामेभावांचा विजेचा धक्का लागून विहिरीत पडून मृत्यू झाला. प्रदीप कैलास वैद्य (वय -18, रा. कुसळी) व गणेश कृष्णा तार्डे (वय -18, अंबड) अशी दोघांची नावे आहेत. सदरील विहीर काठोकाठ भरलेली असल्यामुळे बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलेले असून उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच होते.

भोकरदन तालुक्यातील तीन सख्ख्या भावांचा विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बदनापूर तालुक्यातील कुसळी येथेही अशीच घटना घडल्यामुळे कुसळी गावावर शोककळा पसरली आहे. कुसळी ते माळेगाव रस्त्यावरील गट क्रमांक 93 मधील शिवाजी दत्तात्रय वैद्य यांच्या शेतात ही घटना घडली आहे. काठोकाठ भरलेल्या या विहिरीतील मोटार शेतीच्या सिंचनासाठी चालू करण्याच्या प्रयत्नात 18 वर्षीय नवतरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

प्रदीप आणि गणेश शनिवारी दुपारी विहिरीकडे गेले होते.
गणेश हा तरुण दिवाळीनिमित्त मामाच्या गावाला आलेला होता. तो व प्रदीप दोघे समवयस्क असल्यामुळे दोघेही शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीकडे गेले होते. विहिर जवळपास 80 फूट खोल असून सध्या काठोकाठ भरलेली आहे.

विद्युत मोटार सुरू करूनही पाणी येत नसल्याने ते दोघे पाईप नीट आहे का हे बघत असताना अचानक विजेचा झटका बसून दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली व शोध मोहीम सुरू केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेतला.

घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस सहायक निरीक्षक शाहूराज भिमाळे, पोलिस कर्मचारी संजय उदगिरकर, वाहनचालक संग्राम ठाकूर यांनीही ताबडतोब
घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे जालना येथून अग्नीशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले असून ते जवान दोघांचाही शोध घेत आहेत.