Breaking News

वळूवर अज्ञातांनी केला ऍसिड हल्ला
सातारा : चाफळ फाटा, खालकरवाडी, नाणेगाव (पुनर्वसन) तसेच कळंत्रेवाडी ह्या परिसरामध्ये वावरणाऱ्या भटक्‍या वळू बैलावरती अज्ञातांकडून ऍसिड हल्ला झाल्याची चर्चा येथील ग्रामस्थ दबक्‍या आवाजात आहे. या हल्लया प्रकरणी प्राणी प्रेमीतून संताप व्यक्‍त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंत्रेवाडी ते खालकरवाडी परिसरामध्ये गेल्या पाच वर्षांपासून वळू बैल तसेच गाई यांच्या वावरामुळे येथील नागरिक तसेच शेतकरी त्रस्त आहेत. परिसरातील ऊस, मका, भुईमूग अशा पिकांमध्ये बिनधोकपणे घुसून पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी संबंधित विभागांशी वेळोवेळी संपर्क साधून त्याबाबत कळवले आहे.

वळूंना योग्य त्या सुरक्षित ठिकाणी सोडण्यासंदर्भात मागण्या तसेच प्रयत्न केलेले आहेत. परंतु, संबंधित विभाग हे काम आमच्या आखत्यारीत येत नाही, असे म्हणून हात वर करून जबाबदारी झटकत आहेत. तसेच सदर वळूंपासून बाधित असणाऱ्या गावांच्या ग्रामपंचायती सुध्दा याबाबत गांभीर्याने विचार करीत नाहीत. एकीकडे असे वास्तववादी चित्र पहावयास मिळत असतानाच मानवतावादी दृष्टीकोनातून विचार केल्यास सदर वळू बैलावरती अज्ञातांकडून ऍसिड हल्ला करून त्यांना दुखापत करणे ही बाब निश्‍चीतच समर्थनीय नाही.

सृष्टीने त्या मुक्‍या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार दिला आहे. दरम्यान, एखाद्या गो शाळेशी संपर्क करून त्यांना गोशाळेत सोडणे अथवा जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडणे, अशा पर्यायांचा विचार करणे गरजेचे असताना तसे न करता सगळे पर्याय संपले असे गृहीत धरून मोठ्या उद्वेगाने, द्वेषाने, नैराश्‍यातून असे ऍसिड हल्ला करण्याचे अमानवीय कृत्य करणे निंदनीय आहे. तसेच अशा पध्दतीने मुक्‍या प्राण्यांना मरण यातना भोगावयास लावणे, हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

सदर वळू बैलावरती अज्ञातांकडून एका महिन्यापूर्वी ऍसीड हल्ला झाल्याची चर्चा आहे. तो वळू बैल चालत असताना पाठीमागे जमिनीवरती रक्ताचे थेंब पडत होते. हे पाहिल्यानंतर काही संवेदनशील मनाच्या नागरिकांनी त्या जखमेवर मलमपट्टी करण्याचे भरपूर प्रयत्न केले असल्याची माहिती समोर येत आहे. तरी प्राणी मित्र संघटनेने याविषयी गांभीर्याने लक्ष घालून वळूवरती योग्य ते उपचार करून त्याला सुरक्षित स्थळी सोडून त्याचे जगणे सुखकर करणे गरजेचे
आहे.