अहमदनगरः कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकर्यांच्या बाजूचे...
अहमदनगरः कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकर्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहोत, अशी माहिती महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. वाढीव वीज बिलाच्या मुद्याावरून काँग्रेसमध्ये विसंवाद नसल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यातील दोष आम्ही दाखवत आहोत. हे कायदे नफोखोरांसाठीच बनवले आहेत. या कायद्याविरोधात सहकारी पक्ष आमच्यासोबत आहेत, असे सांगून थोरात म्हणाले, की वाढीव वीज बिलाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी नितीन राऊत यांनी केलेल्या घोषणेवर भाष्य केले असावे. कोरोनाच्या आधीही आमचा 100 युनिटच्या आत वीज वापर असलेल्यांना मदत करण्याबाबतचा विचार होता. कोरोनाच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलात मदत करण्याची मागणी होती. काँग्रेसचे वैशिष्ठ्य आहे, की कुणीही सर्वांसमोर मोकळेपणाने बोलतो.
गेल्या वर्षभरात राज्यावर आलेल्या विविध संकटांचा उल्लेख करून थोरात म्हणाले, की
एक वर्षाच्या काळात खूप संकटे आली. नैसर्गिक संकटांचा आम्ही सक्षमपणे, समर्थपणे सामना केला. याकाळात शासन, प्रशासनाने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला जाईल, तेव्हा निश्चितपणे आमच्या सरकारचे कौतुक होईल. सरकारच्या कामकाजावर विरोधकांकडून होणार्या टीकेबाबत ते म्हणाले, की विरोधी पक्ष म्हणून विरोधक काम करत आहेत. लोकशाहीचा तो भाग आहे. सरकारचे कामकाज सुरू झाले, तेव्हा कोरोना, चक्रीवादळ, पूर यांसारखी संकटे आली. परिणामी आर्थिक स्रोत थांबले. या काळात प्रशासनाला मोठ्या कठीण काळाला सामोरे जावे लागले.
कर्जाबाबत काळजीपूर्वक निर्णय
मदत देण्यासाठी विरोधक कर्ज काढण्याचा पर्याय सुचवत आहेत. त्यावरही थोरात यांनी मत मांडले. राज्याने आधीच 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज काढलेले आहे. ज्याप्रकारे कुटुंबाची काळजी घेतो, तसेच राज्याची काळजी घेत आहोत. त्यामुळे कर्जाबाबत काळजीपूर्वक निर्णय घेत आहोत, असे ते म्हणाले.