कातळशिल्पे आदिमानवाच्या पाऊलखुणा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली कातळशिल्पे ही नवाश्मयुग ते मध्याश्मयुगातील ’भट...
कातळशिल्पे आदिमानवाच्या पाऊलखुणा
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली कातळशिल्पे ही नवाश्मयुग ते मध्याश्मयुगातील ’भटका शिकारी’ (हंटर गॅदरर) अवस्थेत असलेल्या आदिमानवाने खोदली असण्याच्या शक्यतेपर्यंत पुरातत्व संशोधक आले आहेत. याचा कालावधी इ.स.पू. पाच हजार ते 25 हजार असावा, अशी शक्यता पुरातत्वशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. असे असताना त्यांचा संबंध चक्क सिंधु संस्कृती, जरीमरी, महाभारत, बारापाच, ऋग्वेद, आफ्रिकेतील ओगाम लिपी, कोंकणातील नागसंस्कृती (?) यांच्याशी जोडणे अनैतिहासिक आणि हास्यास्पद आहे, असे परखड मत कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी नुकतेच व्यक्त केले.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना लळीत म्हणाले की, देवगड तालुक्यातील साळशी गावात कातळशिल्पे सापडल्याचे वृत्त अलिकडेच वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. या वृत्तात नमद केल्यानुसार या कातळशिल्पांचा संबंध थेट सिंधु संस्कृतीशी जोडण्यात आला आहे. या कातळशिल्पांचा कालावधी, अर्थ याविषयी अनेकजण आपली मते मांडत आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र ऐतिहासिक किंवा प्रागैतिहासिक विषयावर मत मांडताना ते काही ठोकताळ्यांवर आधारित असणे व साधार असणे आवश्यक आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तात अनेक अनैतिहासिक संदर्भ दिल्याचे दिसुन येते. या कातळशिल्पांचा संबंध थेट चक्क जरीमरी, महाभारत, बारापाच, बाराचा पूर्वस, द्रविड संस्कृती, ऋग्वेद, आफ्रिकेतील ओगाम लिपी, कोंकणातील नागसंस्कृती (?) यांच्याशी जोडण्यात आल्याचे वाचून आश्चर्य वाटले. अशा प्रकारच्या निराधार, अनैतिहासिक व सिद्ध न होणार्या तथाकथित दाव्यांमुळे कातळशिल्प या विषयाबाबत सर्वसामान्य जनतेचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. लळीत पुढे म्हणाले की, मी 2001 सालापासून कातळशिल्पांचा अभ्यास करीत आहे. मे 2001 मध्ये मी व प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी हिवाळे (ता. मालवण) येथील धनगर सड्यावरील कातळशिल्पांचा शोध लावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांचा हा पहिला शोध होय. या नंतर 2012 साली कुडोपी (ता. मालवण) येथील कातळशिल्पांचा सविस्तर अभ्यास केला. राष्ट्रीय स्तरावरील पुरातत्व परिषदांमध्ये याबाबतचे शोधनिबंध सादर केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेकजण यावर अभ्यास करीत आहेत. मी केलेला अभ्यासानुसार ही कातळशिल्पे अश्मयुगातील असून त्यातही नवाश्मयुगातील आहेत, असे मत मांडले आहे. बदामी (कर्नाटक) येथील राष्ट्रीय रॉक आर्ट परिषदेत 2012 मध्ये मी जेव्हा याबाबतचा शोधनिबंध सादर करुन याचा कालावधी इ.स.पू. सहा ते 10 हजार वर्षे असा असण्याची शक्यता व्यक्त केली, तेव्हा उपस्थित अनेक नामवंत पुरातत्वज्ञांनी याला दुजोरा दिला. याबाबतचा शोधनिबंध मुंबई विद्यापीठात सादर केला, तेव्हाही माझ्या मताशी ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञांनी सहमती दाखवली. उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले. हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आली होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. मोहेंजोदडो व हडप्पा या दोन्ही शहरात दगडांचे बांधकाम आढळले नाही. कोणत्याही समकालीन संस्कृतीमध्ये न आढळणारी सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीत पाहावयास मिळते. अशा प्रकारे अत्यंत विकसित अशा सिंधु संस्कृतीचा संबंध आदिम अवस्थेतील मानवाच्या कृतींशी जोडणे चुकीचे होईल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.