Breaking News

पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या

संघटनेचे राज्यभर आक्रोश आंदोलन

 - संघटना आक्रमक


जळगाव/रत्नागिरी : प्रतिनिधी

मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारले असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव येथील वाहक मनोज चौधरी यांनी मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे  कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने संतापलेल्या कर्मचार्‍यांनी जळगाव डेपो बंद ठेवत निषेध केला. तर रत्नागिरी येथे पांडुरंग गदडे या एसटी कर्मचार्‍याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

वेतन न मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. रत्नागिरी येथे एसटी कर्मचार्‍याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. पण, ज्या अवस्थेत मृतदेह आढळून आला ती परिस्थिती पाहता ही आत्महत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय, या ठिकाणची परिस्थिती देखील त्यास दुजोरा देणारी अशीच आहे. ज्यावेळी दरवाजा उघडण्यास आला त्यावेळी तो आतून बंद होता. त्यामुळे ही हत्या असल्याचे म्हणू शकत नाही, असे पोलिसांचे मत आहे. पांडुरंग गडदे यांचा आत्महत्या केल्यानंतरचा फोटो समोर आला आहे. यामध्ये त्यांच्या अंगावर कोणत्याही स्वरूपाचा कपडा नाही. विवस्त्र अवस्थेमध्ये लटकलेला मृतदेह लटकलेल्या स्वरूपामध्ये समोर आल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याची चर्चा सुरू आहे. 

संघटनेचे राज्यभर आक्रोश आंदोलन

एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचार्‍यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेने सोमवारपासून राज्यभर आक्रोश आंदोलन पुकारले आहे.  या आंदोलनात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्रक एसटी प्रशासनाने जारी केले आहे. दरम्यान, कामगार करार आणि वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ठोकणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळावे, थकीत तीन महिन्याचे वेतन मिळावे, यासाठी इंटक ने एसटी प्रशासना विरोधात कायदेशीर लढाई सुरू केली होती.