Breaking News

“श्रीं’’ची इच्छा! सोमवारपासून मंदिरे खुली होणार!

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्वपूर्ण घोषणा
- सोशल डिस्टन्स पाळावे लागणार, मास्क वापरावे लागणार


मुंबई/ विशेष प्रतिनिधी

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिले आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरे आणि प्रार्थनस्थळे उघडण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचे म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच पालन करावे लागणार आहे.

गेल्या सात महिन्यांपासून कुलूपबंद असलेला देव आता पुन्हा एकदा भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री यांनी म्हटले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असेही ते म्हणाले. गेल्या एक-दोन महिन्यांपासून राज्यातील मंदिर उघडण्यासाठी आंदोलने सुरु होती. भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने केली होती. तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळे आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. अखेर आठ महिन्यांनी भाविकांना आता मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेता येणार आहे.

हा फक्त सरकारी आदेश नसून ’श्रींची इच्छा

कोरोना काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ’देव’ पांढर्‍या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून ’श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असेही ठाकरे म्हणाले.