दहिवडी / प्रतिनिधी : माणमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार बाई माने यांनीच आता पुढाकार घेतला आहे. नूतन प्रांताधिकारी...
दहिवडी / प्रतिनिधी : माणमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार बाई माने यांनीच आता पुढाकार घेतला आहे. नूतन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज साठा व वाहतूक करणार्यांवर गेल्या नऊ महिन्यांत तब्बल 4 कोटी 57 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. महसूल विभागाकडून वाळूचोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असून धडक कारवायांमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
माण तहसील कार्यालयाकडून एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करून 1 कोटी 20 लाख 86 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी आजअखेर 15 लाख 77 हजारांची वसूली झाली आहे. उर्वरित 1 कोटी 5 लाख 8 हजार वसूल करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 10 जणांना स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे. 21 जणांना लेखी नोटिशीची कारवाई करण्यात आली आहे. काहींच्या नावावरील हिश्श्याच्या जमिनीच्या लिलावाची कार्यवाही करण्याचही नियोजन करण्यात येणार आहे. आजअखेर कारवाई केलेल्या अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी 28 वाहनांची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्यात आली आहे.
सातारा-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून मेघा इंजिनियरिंग अॅड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून (हैदराबाद) या कंपनीकडून 2 कोटींची वसुली केली आहे. माणमध्ये सुरू असलेल्या शासकीय कामातून रॉयल्टीपोटी 2 कोटी 13 लाख 80 हजार रुपयांची वसुली झाली आहे.