नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे?; आंबेडकरांचा खोचक सवाल मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरड...
नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? अजित पवार की उद्धव ठाकरे?; आंबेडकरांचा खोचक सवाल
मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय.
लॉकडाऊन काळात ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे त्यांना वाढीव दराने बिल आल्याची घटना गेले काही महिने घडत आहे. या मुद्द्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वाढीव वीजबिलाबाबत विचार केला जाईल व ग्राहकांना दिलासा दिला जाईल असं सांगितलं होते. पण काही दिवसांपूर्वी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं.
याच पार्श्वभूमीवर भाजप, मनसे पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “वाढीव वीजबिलाच्या माफीबाबत सरकारनं पुन्हा घुमजाव केलं आहे. याबाबतचे निर्णय कोण घेतं. मुख्यमंत्री कोण ? अजित पवार की उद्धव ठाकरे याचा सरकारनं खुलासा करावा,” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
यासोबतच, महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून चुका कबूल केल्या आहेत. आमच्याकडून काही चुका घडलेल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती करावी. 50 टक्के वीजबिल माफ कराण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार परस्पर सवलत नाकारतात. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही प्रश्न विचारतो, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण? याचा खुलासा करा" असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.