Breaking News

बिहारमध्ये ‘नमो नमो’!

 भाजप सर्वात मोठा पक्ष; एनडीएकडे सत्ता?

- तेजस्वी यादवांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडून कडवी झुंज
- नीतीशकुमार यांच्या जनता दल (यू)च्या जागा घटल्या

आघाडी जागा 2015मध्ये
महाआघाडी 112         178
अन्य 08         07
(2015 मध्ये जदयू एनडीएमध्ये नव्हते. ते राजदसोबत होते)

एनडीए 123         58

पाटणा/ खास प्रतिनिधी

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या पदरात बिहारी जनतेने सत्तेचा कौल जवळपास दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असल्याचे स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत पुढे आला. तर एनडीएचा घटक पक्ष असलेला जनता दल (संयुक्त)च्या जागा घटल्या असून, मावळते मुख्यमंत्री नीतीशकुमार यांचे राजकीय वजन घटविण्यात भाजपला यश आले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीने एनडीएला काट्याची टक्कर दिली. फार कमी फरकाने अनेक जागांवर महाआघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. निवडणूक आयोगाने रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, अंतिम निकाल हाती येण्यासाठी देशाला पहाटेची प्रतीक्षा करावी लागू शकते. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयाची जय्यत तयारी चालवली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नीतीशकुमार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत निवडणूक निकालाची माहिती घेतली व त्यांना शुभेच्छाही दिल्यात.

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

पुणे: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटा काढला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला, अशी मिष्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली.  शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केले. या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या. मात्र, नितीश कुमार यांचे फार नुकसान होण्याची भीती होती, तसे घडले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांचे कौतुकही केले. बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. ही निवडणूक मुख्यत्वेकरुन नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती. तेजस्वी यादव यांना संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीपासून लांब राहिलो. तेजस्वी यादव यांनी दिलेली लढत आणि त्यांना मिळालेले यश भविष्यात तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पवार यांनी सांगितले. मात्र, बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, अशी कबुलीही शरद पवार यांनी दिली. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज सकाळपासूनच चढउतार पाहायला मिळत आहेत. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने आघाडी घेतली होती. मात्र, अवघ्या दोन तासांत भाजपप्रणित एनडीएने जोरदार कमबॅक करत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. मात्र, आता संध्याकाळच्या वेळेत महागठबंधनच्या जागांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मतमोजणी संथ असल्यामुळे अद्याप या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.