Breaking News

संजय राऊतांना असले प्रश्न विचारा, पत्रकारांना उत्तर देत चंद्रकांतदादांचे मिश्कील हास्य

 अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आत्मचरित्रामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस आणि कमी योग्यतेचा असा केल्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता, याविषयी मला माहीत नाही, पण असले प्रश्न संजय राऊत यांना विचारा, असा टोला  लगावत चंद्रकांतदादा मिश्कीलपणे हसत निघून गेले.


साताऱ्यात आज भाजप पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा असे म्हणत एका पत्रकाराने चंद्रकांतदादांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. अरे बाबा अमेरिका वगैरे नको, राऊतांना विचारा असे उत्तर पाटील यांनी दिलं. तरीही पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केलाच. ओबामा यांनी आत्मचरित्रामध्ये राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस आणि कमी योग्यतेचा असा केला आहे, त्यावर काय म्हणाल?" असे विचारल्यावर त्यावर ते म्हणाले, अरे एवढे वाचन नाही माझं, संजय राऊतांना विचारा असे म्हणाले.


'अ प्रॉमिस लँड' पुस्तकात ओबामा काय म्हणतात?


राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे, पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते, अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करून दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी व्हाईट हाउसमधील अनुभवांवर आधारित 'अ प्रॉमिस लँड' (A Promised Land) या पुस्तकात मांडले आहे.


सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार


दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे आणि आत्महत्या केलेले इंटिरिअर डेकोरेटर अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण हे जाणीवपूर्वक समोर ठेवून अर्णब गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत पाटील यांना विचारण्यात आला. सोमय्या यांनी काँक्रीट पेपर काढले आहेत, ते खोटे असतील तर त्यांनी (शिवसेना) कोर्टात जावे. लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांनी तो खोडावा असेही पाटील म्हणाले. या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का? असा सवाल करत आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही, असा प्रश्न पाटलांनी उपस्थित केला आहे.