Breaking News

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर घुसला घरात

 धाराशिव

धाराशिवमध्ये एका चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर एका घरात घुसला. त्यामुळे पती पत्नीचा मृत्यू झाला आहे तर दोन मुलं जखमी झाले आहेत.

ढोकी येथील तेरणा कारखान्याच्या जवळ ढोकी - लातूर राज्य महामार्गाच्या बाजुला अनेक कुटूंबीयांनी जागा भाड्याने घेऊन आपले व्यावसाय थाटले आहेत. यातील अनेक कुटूंबे याच ठिकाणी राहतात. घिसाडी काम करणारे सुरवसे कुटूंबही याच ठिकाणी राहते. मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास ढोकीहून मुरुडकडे जाणाऱया टिप्परवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टिप्पर विरुध्द दिशेला जावून पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. या टिप्परचा वेग प्रचंड असल्याने हा शेडमध्ये घुसला. यावेळी आपल्या दोन नातवंडासह झोपलेल्या प्रकाश बाबुराव सुरवसे (60), त्यांच्या पत्नी मुद्रिकाबाई सुरवसे यांच्या अंगावरुन हा टिप्पर गेला. यामध्ये प्रकाश बाबुराव सुरवसे हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी मुद्रिकाबाई सुरवसे यांना उपचारासाठी धाराशिव येथे घेवून जात असताना वाटेतच त्या मृत्यूमुखी पडल्या. यामध्ये नातु आकाश गणपत सुरवसे (11), आक्षरा प्रल्हाद सुरवसे (12) जबर जखमी झाले आहेत.

आकाश गणपत सुरवसे याच्या डोक्यास जबर मार लागल्याने उपचाराठी बार्शी येथील जगदाळे हाँस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून अक्षरावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या टिप्परमध्ये तीन ते चार जण प्रवास करत होते. यावेळी हे सर्वजण बेशुध्द पडलेले असून चालक फरार झाला. या टिप्परला पासिंग नसल्याने संबधित टिप्परची ओळख पटण्यास उशीर झाला. तरी ढोकी पोलीसानी या टिप्परच्या चिसीच्या नंबरवरुन या टिप्परच्या मालकाची ओळख पटवली असून सदरील टिप्परचा मालक हा निंबाळकर आडनावाचा धाराशीव तालुक्यातील आळणीचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.