विटा / प्रतिनिधी : मालमत्तेविरुध्दच्या रेकॉर्डवरील आरोपींना हद्दपार करा अशा सूचना आल्यानंतर खानापूर तालुक्यातील चौघांना सांगली, सातारा आणि...
विटा / प्रतिनिधी : मालमत्तेविरुध्दच्या रेकॉर्डवरील आरोपींना हद्दपार करा अशा सूचना आल्यानंतर खानापूर तालुक्यातील चौघांना सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईत लेंगरेच्या अमोल शहाजी शिरतोडे, जोंधळखिंडी येथील संतोष भिमराव जावीर, राजेंद्र रामचंद्र मोहिते आणि आनंदा गणपत आडके या चौघांचा समावेश आहे.
अमोल शहाजी शिरतोडे (वय 23), जोंधळखिंडी येथील संतोष भिमराव जावीर (वय 29), राजेंद्र रामचंद्र मोहिते (वय 34) आणि आनंदा गणपत आडके (वय 31) हे चौघे विटा पोलीस ठाण्यात रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार आहेत. हे चौघे कायम रात्रीच्या वेळी चोरी, घरफोडी सारखे गुन्हे करत आहेत. या चौघांना अटक करून कारवाई केली असता न्यायालयाकडून जामीन मिळवून ते बाहेर येत होते. त्यानंतर ते पुन्हा अशाच स्वरूपाचे गुन्हे करत होते. त्यातून त्यांना संघटीत टोळीचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी या टोळीच्या कृत्यांमुळे नागरिकांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाला. तसेच विटा आणि परिसरातील रहिवाश्यांवर विपरीत परिणाम होत असून तेथे भितीचे वातावरण निर्णाण झाले होते. त्यामुळे अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा डुबुले, उपविभागिय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे यांनी मालमत्तेविरुध्दच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील या आरोपींना हद्दपार करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी त्यांच्या सगळ्या गुन्ह्यांची माहिती एकत्रित करून त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे या चारही आरोपींना सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरीता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक हणमंत लोहार, शशिकांत माळी, सुरेश भोसले, राजेंद्र भिंगारदेवे, अमर सूर्यवंशी यांनी केली.