Breaking News

मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठाचा निर्णय लवकरच!

 - सरन्यायाधीशांचे सूतोवाच : अशोक चव्हाणांची माहिती

- राज्य सरकारकडून तिसर्‍यांदा अर्ज सादर


मुंबई/ प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करा. त्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करावी, अशी मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. राज्य सरकारने या मागणीचा सोमवारी तिसर्‍यांदा सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज सादर केला, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबत तिसर्‍यांदा अर्ज दाखल केल्याची माहिती ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितली. त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक आहे, असे रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना सांगितले.

--------------------------