Breaking News

पीओकेमध्ये भारताकडून 'पिनपॉईंट स्ट्राईक

  



 दिल्ली: भारतीय लष्करानं पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पिनपॉईंट स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. पीओकेतील दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्करानं ही कारवाई केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. सीमेवरून दहशतवादी घुसवता यावेत यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं स्ट्राईक केल्याची माहिती 'आऊटलूक'नं सरकारमधील सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.


हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न होतात. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी यासाठी सीमावर्ती भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानं 'पिनपॉईंट स्ट्राईक' सुरू केले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू असल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य काश्मीरमधील अनेक सेक्टर्समध्ये गोळीबार करत आहे. त्यांच्याकडून अनेकदा सामन्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच दुसऱ्या बाजूनं पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना 'कव्हर फायर' देत आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीला सैन्याचं थेट सहकार्य मिळत असल्यानं भारतीय सैन्यानं पीओकेमध्ये कारवाई सुरू केल्याचं सरकारमधील सुत्रांनी सांगितलं.