आमदार आशुतोष काळे यांच्या समृद्धीच्या अधिकार्यांना समज कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामु...
आमदार आशुतोष काळे यांच्या समृद्धीच्या अधिकार्यांना समज
कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे प्रकल्पबाधित शेतकर्यांचे नुकसान होत असून, रस्ते दुरुस्तीकडे समृद्धी महामार्ग दूर्लक्ष करत असल्याचा शेतकर्यांचा आरोप होता. याप्रकरणी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकर्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन, गायत्री प्रोजेक्टस कंपनीचे उपाध्यक्ष के.एस.रेड्डी यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बोलावून घेवून यापुढे प्रकल्पबाधित व परिसरातील शेतकर्यांच्या तक्रारी येवू देवू नका अशी समज दिली आहे.
समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरु आहे त्या परिसरातील रस्त्यांची वाट लागली आहे. समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतांना ज्या रस्त्यांचा वापर होणार आहे त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला बंधनकारक आहे. तरीही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून समृद्धी महामार्गाचे काम सुरूच होते. त्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या तक्रारीचा पाढा वाचला होता. मुख्य रस्ते व गावातील इतर रस्त्यावरून गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचे अवजड वाहने जात असल्यामुळे आज या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले असून सर्वत्र प्रचंड धूळ असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा अनेक तक्रारी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे शेतकर्यांनी मांडल्या होत्या. त्याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचे उपाध्यक्ष रेड्डी यांना समज दिली होती. तसेच आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच एम. एस.आर.डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार यांची भेट घेतली. खराब झालेल्या रस्त्यांच्या समस्येत लक्ष घालून खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याबाबत गायत्री प्रोजेक्टस कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी केली. याप्रसंगी एम. एस.आर.डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार,अधिक्षक अभियंता निघोट, प्रांत विठ्ठल सोनवणे, गायत्री प्रोजेक्टस कंपनीचे उपाध्यक्ष के.एस.रेड्डी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, चारुदत्त सिनगर, रोहिदास होन आदी उपस्थित होते.