933 लाभार्थ्यांसाठी 11 कोटी 19 लाखांचे अनुदान; आ.रोहित पवारांचा पाठपुरावा जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनें...
933 लाभार्थ्यांसाठी 11 कोटी 19 लाखांचे अनुदान; आ.रोहित पवारांचा पाठपुरावा
जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पाचे एकूण 933 लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान अखेर राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने नगर परिषदेच्या खात्यात वर्ग झाले आहे.
जामखेड नगर परिषदेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेनंतर्ग एकूण 933 लाभार्थी असून या प्रकल्पाचे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित होते. रखडलेल्या अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात आ. रोहित पवारांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी याबाबत चर्चा केली. 19 नोव्हेंबर रोजी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे प्रलंबित अनुदानासाठी आमदार पवारांनी पत्रव्यवहार केला व रखडलेले हे अनुदान तात्काळ वितरित होण्याबाबत पाठपुरावाही केला होता. 24 नोव्हेंबर रोजी लेखाधिकारी, वित्त नियंत्रण, गृहनिर्माण भवन, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या पत्रान्वये जामखेड नगर परिषद येथील 933 लाभार्थ्यांच्या घरकुल प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्याचे 11 कोटी 19 लक्ष 60 हजार एवढे अनुदान जामखेड नगर परिषदेच्या खात्यामध्ये नुकतेच वितरित करण्यात आले आहेत. ’सार्वजनिक वित्त व्यवस्थापण प्रणाली’द्वारे हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.रखडलेल्या या अनुदानाचे संबंधित लाभार्थ्यांना लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी बोलताना सांगितले.