Breaking News

अर्थव्यवस्थेला खीळ, बेरोजगारीचा उच्चांक!

 अग्रलेख

अर्थव्यवस्थेला खीळ, बेरोजगारीचा उच्चांक!

अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सप्टेंबरमध्ये 6.67 टक्क्यांवर असणारा शहरी बेरोजगारीचा दर ऑक्टोबरमध्ये 6.98 टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. मात्र, ग्रामीण बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली. सप्टेंबरमध्ये 5.86 टक्क्यांवर  असणारा बेरोजगारीचा हा दर ऑक्टोबरअखेर 6.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीतर्फे (सीएमआयई) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये हरियाणातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक 27.3 टक्के होता. तर त्या खालोखाल बिहार व महाराष्ट्राचा होता. कोरोना महारोग निवारण्यात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला मोठे अपयश आले आहे. त्यामुळेच देशात रोजगार आणि आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, भारतात बहुसंख्य लोक रोजंदारीवर काम करतात. या लॉकडाऊनचा गंभीर परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल. आपण सरसकट लॉकडाऊन केल्यामुळे मृतांचा आकडा वाढेल, बेरोजगारी निर्माण होईल. दुर्देवाने आज तंतोतंत तसेच घडत आहे. ज्या राहुल गांधींना भाजपच्या नेतृत्वाने कायम अव्हेरले तेच राहुल काल जे बोललेत तेच आज घडते आहे; याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा राहुल गांधी यांची राजकीय, सामाजिक व आर्थिक समज मोठी आहे. खरे तर भारताची परिस्थिती वेगळी आहे. इतर देशांप्रमाणे भारतात सरसकट लॉकडाऊन करणे ही घोडचूकच होती. खरे तर ज्यांना धोका होता त्या ज्येष्ठांना अलग केले असते तरी प्रश्‍न सुटला असता. अगदीच अनागोदींने लागू केलेल्या लॉकडाउनमुळे हजारो स्थलांतरितांना त्याचे घरदार सोडून रस्त्यावर निघावे लागले होते. त्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्यात, जे मृत्यू झालेत, त्यासाठी केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदी यांनाच दोषी धरले जावे. जागतिक कामगार संघटनेचे भाकित होते, की केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत आणि भविष्यातही अनेकांच्या नोकर्‍यांवर टांगती तलवार आहे. त्यांचा अंदाज आहे की, या कोरोनामुळे जगभरातल्या अंदाजे अडीच कोटी जणांच्या नोकर्‍या जाणार आहेत. सीएमआयईच्या मते तर, करोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगभरातील अर्थव्यवस्था करोनामुळे प्रभावित झाल्या असून, त्यामध्ये भारताचाही हातभार लागला. करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली असली तरी, हळूहळू का होईना ती पूर्वपदावर येण्याचे संकेत अद्यापही मिळत नाहीत. चालू वर्षासाठी देशातील बेरोजगारीचा अंदाजित दर 5.4 टक्के निर्धारित करण्यात आला आहे. लॉकडाउननंतर छोटे मोठे कारखाने बंद झाले आहेत, पुरवठा साखळी तुटली आहे. थिएटर बंद झालीत, दुकाने, मॉल बंद झाली, इतकेच काय तर मंदिरे बंद झालीत. त्यामुळे एकट्या मुंबईचा विचार करता, मुंबईचे एका महिनाभराचे नुकसान 16 हजार कोटी रुपये इतके आहे. म्हणजेच एक दिवस मुंबई बंद असेल तर 500 कोटी रुपयाचे नुकसान होते. आता तर अजूनही मुंबई सुरुळीत झालेली नाही. बेरोजगारीच्या बाबतीत राज्यांमध्ये हरियाणाने 27.3 टक्क्यांसह अव्वलस्थान पटकावले. त्यानंतर राजस्थान 24.1 टक्के, जम्मू आणि काश्मीर 16.1 टक्के आणि हिमाचल प्रदेशचा 13.5 टक्क्यांसह क्रमांक लागतो. सिक्कीममध्ये 0.9 टक्के इतका बेरोजगारीचा दर सर्वांत कमी आहे. उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर अनुक्रमे 3.8 टक्के, 9.8 टक्के आणि 3.1 टक्के असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, गुजरात आणि महाराष्ट्रात हाच दर अनुक्रमे 4 आणि 4.1 टक्के असल्याचे दिसून आले. म्हणजे, सातत्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु असतानादेखील रोजगारनिर्मितीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकू शकली नाही. कारण, रोजगार निर्मितीसाठी अर्थव्यवस्था सक्षम होणे गरजेचे असते. काही महिन्यांसाठी अर्थव्यवस्था खिळखिळी राहिली किंवा सातत्याने विकासदरात घसरण होत असेल तर त्याला रिसेशन किंवा मंदी म्हणतात. हीच स्थिती जर बराच काळ टिकली आणि विकासदर नकारात्मकच झाला तर त्याला डिप्रेशन किंवा महामंदी म्हणतात. भारतात अशी परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. अजूनही अर्थव्यवस्था धोक्यात असून, रोजगारनिर्मिती ठप्प पडलेली आहे. बर्‍याच जणांना आठवत असेल 2008 साली मंदी आली होती. सध्याची जागतिक अर्थव्यवस्था खालावली आहे. या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी अमेरिका, युनायटेड किंगडमसारख्या देशांनी पॅकेज जाहीर केले आहेत. भारतानेही असेच पॅकेज जाहीर केले होते. परंतु, ते फसवे ठरले. मोदी सरकारने वांझोटे पॅकेज जाहीर करून देशवासीयांची निव्वळ फसवणूक केली. या पॅकेजचा कुणालाही लाभ झाला नाही. जर खरेच पॅकेज दिले असते तर आज अर्थव्यवस्थेला मरगळ आली नसती, आणि बेरोजगारीचे संकटही निर्माण झाले नसते.

--------------------