Breaking News

भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न होता!

- प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

- ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका


औरंगाबाद/ विशेष प्रतिनिधी

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचा  दंगली घडवण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असेही आंबेडकर म्हणाले. त्याचबरोबर ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला काठावर बहुमत मिळाले आहे. 125 जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जदयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे. असे असले तरी आपण हा एनडीएचा विजय मानत नसल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला.

ईव्हीएम मशीनवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह!

बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला 10 हजारापर्यंत श्रोते उपस्थित असायचे. कोरोना काळात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मग अशावेळी ती व्यक्ती चार नंबरला कशी काय फेकली जाऊ शकते? असा प्रश्‍न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीन आणि निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढेच काम निवडणूक आयोग करत असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. ईव्हीएम मशीन हे रिटर्निंग ऑफिसरच्या हातात असतात. त्या रिटर्निंग ऑफिसरकडून स्पष्टीकरण मागावे, अशी विनंती आपण न्यायालयाकडे करत असल्याचेही आंबेडकर म्हणाले.