Breaking News

साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंच्या मुलाला अटक

- बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरण

- बोगस पावत्यांच्याआधारे 520 कोटींचा आयटीसी मिळवला


मुंबई/ प्रतिनिधी

साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टेला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी ही अटक करण्यात आली. जीएसटी गुप्तचर महासंचालनायाने (डीजीजीआय) ही कारवाई केली आहे. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारावर 520 कोटी रुपये आयटीसी (इनपूट टॅक्स क्रेडिट) मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टे यांच्यावर आहे. सुनील गुट्टेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुनील गुट्टे हे हायटेक इंजिनीअरिंग लिमिटेडचे संचालक आहेत. कागदपत्रांची अफरातफर करुन बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसीचा मिळवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडने अंदाजे तीन हजार कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात 520 कोटींचा आयटीसी समाविष्ट आहे. या बोगस बिलांचे जाळे नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मेरठ अहमदाबाद आणि कोलकातापर्यंत पसरले आहे. देशभरात बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याप्रकरणी सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडची मुख्य भूमिका आहे. सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेड ही संपूर्ण भारतात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी प्रमुख घोटाळेबाज कंपन्यापैकी एक असल्याचे जीएसटी विभागाने म्हटले आहे. सुनील गुट्टेशिवाय डीजीजीआयने श्री ओशिया फेरो एलॉय प्रायव्हेट लिमिटेडच्या विजेंद्र विजयराज रांका यांनाही अटक केली आहे. या कंपनीवरही बोगस व्यवहाराचा आरोप आहे. वस्तूंचा संपूर्ण पुरवठा न करताच 1371 कोटी रुपयांच्या बिलांची देवाणघेवाण करण्यात आली. त्यात 209 कोटींच्या आयटीसीच्या लाभाचा समावेश आहे. गुट्टे आणि रांका या दोघांनाही स्थानिक कोर्टात हजर करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

----------------------