Breaking News

व्हिएन्ना गोळीबाराचा जगभरातून निषेध

गोळीबारात 7 जण ठार; एका हल्लेखोरालाही कंठस्नान

- व्हिएन्नातील 6 ठिकाणी गोळीबार

- भारत कठीण प्रसंगी ऑस्ट्रियासोबत ठामपणे उभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

युरोपातील ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहराच्या मध्यभागी यहुदी उपासनागृहाजवळ झालेल्या गोळीबारात सात जण ठार झाले आहेत. तसेच एका हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. हा गोळीबार व्हिएन्ना शहरातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी झाला. या गोळीबाराचा जगभरातून निषेध करण्यात येत असून,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोळीबाराचा निषेध केला आहे. व्हिएन्नातील दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का बसला. भारत या दु:खद प्रसंगी तुमच्या सोबत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी गोळीबारात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांच्याबद्दल संवदेना व्यक्त केल्या आहेत. 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युअल मॅक्रॉन यांनीदेखील ऑस्ट्रियाच्या नागरिकांसोबत असल्याचे म्हटले आहे. आमच्या दुश्मनांनी कुणासोबत लढत आहोत हे लक्षात घ्यावे. आम्ही झुकणार नाही, असे मॅक्रॉन म्हणाले. आमच्या आणखी एका मित्र राष्ट्रावर हल्ला झाला आहे. युरोप आमचा आहे, हे दुश्मनांनी लक्षात ठेवावे, असं मॅक्रॉन म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबारात जीव गमवालेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त केल्या. निर्दोष लोकांवर होणार्‍या क्रूर हल्ल्यांना रोखायला हवे, असे ते म्हणाले. अमेरिका कट्टरपंथी इस्लामी दहशतावादाविरुद्ध ऑस्ट्रिया आणि फ्रान्स सह युरोपसोबत उभा आहे, असे ट्रम्प म्हणाले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीदेखील ऑस्ट्रियामध्ये झालेल्या गोळीबाराचा निषेध केला. व्हिएन्नामधील गोळीबारामुळे स्तब्ध आहे. ब्रिटन याप्रसंगी ऑस्ट्रियासोबत उभा आहे, असे जॉनसन म्हणाले आहेत. दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) व्हिएन्ना शहराच्या मध्यभागी ज्यूंच्या एका उपासनागृहाच्या शेजारी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सात जण ठार झाले. स्पुतनिकच्या वृत्तानुसार, पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एकाला मारले, परंतु त्याचे साथीदार तेथून पळून गेले.