नवी मुंबई/ प्रतिनिधी पुणे दौर्यावर येणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने अडवण्याचा एल्गार करण्या...
नवी मुंबई/ प्रतिनिधी
पुणे दौर्यावर येणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने अडवण्याचा एल्गार करण्यात आला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली.
मराठा समाजाला ना राज्याच्या सुविधा मिळत आहेत, ना केंद्राच्या. मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कधीपर्यंत सहन करणार? शासकीय सेवेत आणि शिक्षणात मराठा समाजाला डावलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात, मराठा समाजाचा आढावा घ्यावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुण्यात मोदींचा मार्ग अडवून भेट घेणार आहोत, असे आबासाहेब पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सीरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. त्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत सीरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडीतील जिनेव्हा बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि 100 देशांच्या राजदूतांचा दौरा नक्की असून, त्याची अधिकृत माहिती लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिली आहे.
--
मोदी शनिवारी पुण्यात, सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
संपूर्ण जगाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणार्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडे लागले आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28) रोजी पुणे दौर्यावर येत असून, ते पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आढावा घेणार आहेत. मोदी यांच्या दौर्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान कार्यालयाकडून मोदी यांच्या दौर्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला. शंभर देशांचे राजदूत 4 डिसेंबर रोजी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी शनिवारी (दि.28 ) रोजी सीरमला भेट देऊन आढाव घेणार असल्याची माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.