Breaking News

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अर्णब गोस्वामींचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

- खेळ आता सुरु झालाय..; जामिनानंतर अर्णब गोस्वामी यांचा सरकारला थेट इशारा


मुंबई/ प्रतिनिधी

मराठी उद्योगपती व वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. ‘उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे’, असा इशारा अर्णब यांनी दिला आहे. तसेच ‘उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणा केली. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचे ते म्हणाले. ‘मी तुरुंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही’, असेही त्यांनी आक्रमक होत म्हटले. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सरकारने राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.