त्र्यंबकेश्वर/प्रतिनिधी : नगरीची अस्मिता, वैभव असणार्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या रथोत्सवाची तयारी पंधरा दिवसां पासुन सुरु होती. दिवाळ...
त्र्यंबकेश्वर/प्रतिनिधी : नगरीची अस्मिता, वैभव असणार्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या रथोत्सवाची तयारी पंधरा दिवसां पासुन सुरु होती. दिवाळी पासुन ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत त्र्यंबकराजाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथाला रंगरंगोटी करुन रथ रस्त्यावर आणण्यात आला. नगर पालीकेने रथ मार्गावरील खड्डे बुजवले. प्रशासनाने रथ मार्गाची पाहणी केली, पोलीसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. भाविक व ग्रामस्थांसाठी काही निर्बंध लावण्यात आले. रथ मार्गावरील दुकाने रविवारी दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे लेखी आदेश नगर पालीकेने प्रत्येक दुकानदारांना दिले. एवढं सगळं करुन रथोत्सव संपन्न होणार म्हणुन नगरवासीय आनंदात होते. मात्र ऐनवेळी प्रांताधिकार्यांनी
रथोत्सवाला परवानगी देता येणार नसल्याचे पत्र देऊन नागरीकांचा हिरमोड केला. त्यामुळे परवानगी द्यायची नव्हती तर तयारी तरी कशाला करायला लावली? अशी भावना व्यक्त होत आहे.
नगरीचा सर्वात मोठा उत्सव म्हणुन त्र्यंबकेश्वर देवस्थान कडुन जोरदार तयारी सुरु असतांना प्रांताधिर्यांनी रात्री उशीरा रथोत्सवाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करीत परवानगी नाकारली.
गेले पंधरा दिवसांपासुन येथे रथोत्सवाची जोरदार तयारी सुरु होती. त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीला प्रशासकीय अधिकारी देखील होते. इगतपुरी त्र्यंबकचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, रथोत्सव मेळा प्रभारी कातकाडे, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सपोनि शिवचरण पांढरे यांचेसह देवस्थानचे विश्वस्त दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे आदींनी त्र्यंबकेश्वर मंदीर ते कुशावर्त तीर्थ या रथमार्गाची पाहणी केल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवले गेले. रथोत्सवाचा सजलेला रथ रस्त्यावर आणण्यात आला. त्र्यंबक देवस्थानने नियम व व्यवस्था याबाबद प्रसार माध्यमांना प्रेस नोट दिली. हे सगळे महसुल, पोलीस आणी स्थानिक पालीकेच्या नियोजनानुसार घडत असतांना रात्रा आठच्या सुमारास प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी कोविडचे कारण आणी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन रथोत्सवाला परवानगी नाकारल्याचे पत्र देवस्थानला दिले.
एवढी सगळी तयारी झाल्यावर परवानगीच द्यायची नव्हती तर तयारी तरी कशाला करायला लावली? अशी भावना नागरीकांनी व्यक्त केली.
रथोत्सवाची परंपरा
या मागील पौराणिक कथा अशी आहे की , पृथ्वीवर उत्पाद माजविणाऱ्या दानव त्रिपुरासुराच्या त्रासापासुन मुक्ती मिळण्यासाठी सर्व देवदेवता भगवान शंकराला शरण गेले . भगवान शंकरांनी तीन दिवस अहोरात्र युद्ध करून त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा म्हणुन या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हा दिवस विजय दिन म्हणुन साजरा केला जातो. भगवान शंकराचा विजय व्हावा म्हणुन देवी पावतीने कडक आराधना करून वाती जाळल्या म्हणुन या दिवशी महिला त्रिपुरवाती जाळतात. या आख्यायिकेला अनुसरून भगवान त्र्यंबकेश्वराचा रथोत्सव साजरा करण्यात येतो. त्यावेळी भगवान शंकराच्या रथाचे सारथ्य ब्रह्मदेवांनी केले होते म्हणुन रथावर ब्रह्मदेवांची मुर्ती ठेवण्यात येते.
पूर्वी भाविक व स्थानिक लोक हौसेने व श्रद्धेने हा रथ स्वत: ओढीत असत परंतू काळाच्या ओघात ही पद्धत बंद झाली व आता बैलजोड्यांद्वारे हा रथ ओढला जातो. संपूर्ण रथ मार्गावर नागरिकांकडून सडारांगोळी करण्यात येते. तर काही ठिकाणी हौशी नागरिक व स्वयंसेवी मंडळांकडून आकर्षक फुलांची सजावट व रांगोळी देखील काढण्यात येते. रथोत्सवाची ही मिरवणूक पाहण्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरासह परिसरातील नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळते. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून कुशावर्त तीर्थापर्यंत हा रथ नेला जातो. कुशावर्त तीर्थावर महामृत्युंजय भगवान त्र्यंबकेश्वरांच्या पंचमुखी मुखवट्यास स्नान घालून विधिवत पूजा, आरती संपन्न झाल्यावर पुन्हा रथ मार्गस्थ होतो. यावेळी रथासमोर फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात येत असते. रथाचे त्र्यंबकेश्वर मंदिरात आगमन झाल्यावर विधिवत पूजा करुन मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात येते.
आज, उद्या काय घडामोडी घडतात? रथोत्सव होणार की १५५ वर्षांची परंपरा खंडीत होणार ? याकडे संपुर्ण नगरीचे लक्ष लागले आहे. भगवान त्र्यंबकराजाचा रथोत्सव संपन्न होऊ दे, असे साकडे नगरवासीयांनी खुद्द भगवान त्र्यंबकराजालाच घातले आहे.