कुपवाड / प्रतिनिधी : पाणी शुध्दीकरण करणारे बनावट यंत्र तयार करणार्या कारखान्यावर कुपवाड पोलीस व मूळ कंपनीच्या संचालकांनी छापा टाकून 48 लाख...
कुपवाड / प्रतिनिधी : पाणी शुध्दीकरण करणारे बनावट यंत्र तयार करणार्या कारखान्यावर कुपवाड पोलीस व मूळ कंपनीच्या संचालकांनी छापा टाकून 48 लाख 92 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित सुनील गंगाराम अथणीकर (वय 40, रा. महात्मा गांधी गृहनिर्माण सोसायटी, कुपवाड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईतील युरेका फोब्स लिमिटेड या कंपनीचे बनावट यंत्र कुपवाड येथे तयार होत असल्याची तक्रार कंपनीचे अधिकारी आशिष शरदराव पाटील (रा. कोल्हापूर) यांनी कुपवाड पोलिसात बुधवारी दाखल केली. त्यानुसार सपोनि निरज उबाळे व आशिष पाटील यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. संशयित सुनील अथणीकर यांनी युरेका फोब्स या कंपनीचे ऍक्वा फिल्टर हे पाणी शुध्दीकरण करणारे यंत्र मूळ कंपनीच्या नावाने उत्पादित करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 48 लाख 92 हजार 500 रुपयांचे 103 बॉक्स जप्त केले. याप्रकरणी सुनील अथणीकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.