केज तालुक्यात डोका (हादगाव) शिवारात महिलेचा खून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांची भेट केज :- केज तालुक्यातील डोका (हादगाव) ...
केज तालुक्यात डोका (हादगाव) शिवारात महिलेचा खून
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांची भेट
केज :-
केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे आत्याच्या वर्षश्रध्दाधासाठी सांगली येथून माहेरी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती येते की, सांगली येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारी मीरा बाबुराव रंधवे ही महिला तिची आत्या गांधारी इनकर हिच्या वर्ष श्रद्धासाठी डोका येथे आली होती. तीने दि. २४ रोजी अभिजीत ड्रेसेस मधून कपडे खरेदी करून रात्री सुमारे ९:३० वा. च्या दरम्यान डोका येथील गावच्या पश्चिम दिशेने वाहणाऱ्या बोभाटी नदी शेजारील शेतातील भांगे-इनकर वस्ती वरील वडिलांच्या घराकडे जात असताना रस्त्यात तिचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला. तिचा पूर्ण चेहरा व डोक्याची कवटी दगडाने चेंदामेंदा केली आहे. ती रात्री घरी आली नाही तसेच रात्री ९:०० पासून मोबाईल बंद असल्याने ती महिला केज येथे नातेवाईकाकडे मुक्कामी राहिली असावी असे तिच्या आईवडिलांना वाटले. घटनास्थळावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, हनुमंत गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजच्या तपास पथकाचे राऊत, अहंकारे, शेख तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मयत महिलेच्या अंगावर लाल गुलाबी रंगाची साडी व गडद निळ्या रंगाचे ब्लाउज असून पायात चपला आहे. प्रेता जवळ दोन पिशव्या पडलेले असून शेजारी दगड पडलेला आहे. हा खून एवढा भयानक पद्ध्तीने केलेला आहे की, तिचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून पूर्ण चेंदामेंदा केला आहे. तिची पूर्ण कवटी फुटून आतील मेंदू आणि दात व अवशेष पडलेले आहेत.
दरम्यान घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांनी भेट दिली आणि पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविले आहे.