Breaking News

बीडमध्ये तरुणीवर अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले

 - तब्बल 12 तास तरफडून तरुणीचा मृत्यू 

- आरोपी प्रियकरास नांदेडमध्ये अटक

- प्रेयसीला पुण्यातून बीडला घेऊन गेला; पहिल्यांदा अ‍ॅसिड फेकले मग पेट्रोल टाकून जीवंत जाळले!

नेकनूर/ प्रतिनिधी 

बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न तिच्या प्रियकराने केला होता. या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान या पीडित तरूणीचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील सावित्रा डिंगबर अंकूरवर (वय 22) ही गावातीलच अविनाश रामकीसन राजुरे (वय 25) याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून पुण्यात रिलेशनशिप मध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात एका खडी क्रेशरजवळ सदरील जोडपे मुक्कामास थांबले. पहाटेच्या सुमारास प्रियकराने आपल्या प्रियसीचा सुरवातीला गळा दाबून, अ‍ॅसीड टाकले. यानंतर पेट्रोल टाकून अमानुषपणे आग लावली आणि तेथून आरोपी पसार झाला. पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत सदरील तरुणी तडफडत राहिली. दुपारी रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांची तिच्यावर नजर पडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी पोलिस गाडीतून नेकनुर आणि नेकनुरमधुन म्बुलन्सने बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने या तरुणीचे 48 टक्के शरीर भाजले होते. पीडितेच्या जवाबावरून आरोपी अविनाश रामकीसन राजुरेवर नेकनूर ठाण्यात भादविंच्या कलम 307 / 326 प्रमाणेगुन्हा नोंदवण्यात आला. रविवारी सकाळी तिचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून, नांदेड पोलिसांनी आरोपीला एका ढाब्यावरून अटक केली व नेकनुर पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरील प्रकरणाचा एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास जाधव करत आहेत.

दरम्यान, या घटनेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह डॉ. नीलम गोर्‍हेयांनी तीव्र निषेध केला आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. शनिवारी ही घटना घडली. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज (15 नोव्हेंबर) तिचा मृत्यू झाला. मृत पीडिता ही नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे. त्याच गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून ती पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती. देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील पीडितेचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, गावातच असलेल्या अविनाश राजूरे या तरुणावर तिचे प्रेम होते. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ राहण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघांनीही गावातून पलायन करुन पुणे गाठले. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले. अविनाशला दुसरे लग्न करण्यासाठी घरातील मंडळीने घाट घातला होता. त्यामुळे अविनाशने गावाकडं जाण्यासाठी पीडितेला सोबत घेतले. दोघेही पुण्यावरुन दुचाकीवर गावाकडे निघाले. बीडजवळ येताच अविनाशने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तिथून पसार झाला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक तिच्या मदतीला धावले . जखमी पीडितेला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा आज मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अविनाश राजूरे याला नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील आदमपूर येथील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आली आहे. देगलूर पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.