Breaking News

वीज बिल भरु नका!

 - प्रकाश आंबेडकर यांचेआवाहन

- बिले भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल


नांदेड/ प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर  यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना विचारला आहे. लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कालच सांगितले होते.

लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल भरु नये, असे आवाहन केले आहे. बिले भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला. राज्यातील वीज ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला होता, तो कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला, याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. आंबेडकर नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखवल्याने आणि वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे, असा घणाघाती आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केला आहे. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली होती. कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये 59 हजार 102 कोटींवर पोहोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोहोचली, तर वाणिज्य ग्राहकांची थकबाकी 879 कोटींवरुन 1241 कोटींवर आणि औद्योगिक ग्राहकांची थकबाकी 472 वरुन 982 कोटींवर पोहोचली, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

-------------------