Breaking News

उद्यापासून नाट्यगृह, सिनेमागृह सुरू होणार

- ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध


मुंबई/ प्रतिनिधी

राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्सेस 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्सेसमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल. 

राज्य सरकारने बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. सॅनिटायझेशनची व्यवस्था आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खेळाडूंना या ठिकाणी सराव करता येईल. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहतील. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असणारी योगा अभ्यास केंद्रे सुरू करण्याची मुभादेखील देण्यात आली आहे. यासाठीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभाग जारी करेल. त्यासाठी हा विभाग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार घेईल, असे सरकारने पत्रकात म्हटले आहे. गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.