Breaking News

अर्णब गोस्वामींना हायकोर्टाचा झटका!

 - अंतरिम जामीन नाहीच!

- कोर्टाने अर्ज फेटाळला; तळोजातील मुक्काम कायम


मुंबई/ प्रतिनिधी

मराठी उद्योगपती व वास्तूविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार व रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता अर्णब यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून, सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावे लागणार आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर सोमवारी न्यायपीठाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णब यांना जामीन देण्यास नकार दिला. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. यासंदर्भात राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.