Breaking News

नीतीशकुमार यांचा उद्या शपथविधी!

 मुख्यमंत्रि पदाची धुरा नीतीश कुमारांकडेच!

- एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदी निवड

- भाजपचे सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्री?


पाटणा/ प्रतिनिधी

संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नीतीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. हा निर्णय एनडीच्या विधायक दलाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. त्यानंतर नीतीशकुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा दाखल केला. आपणास 126 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत, आमदारांच्या समर्थनाचे पत्र त्यांनी राज्यपाल फागून चौहान यांना सादर केले. सोमवारी सायंकाळी 4 वाजता नीतीशकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याच्या दिशेने रविवारी जोरदार बैठका झाल्यात. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर एनडीएच्या विधिमंडळ पक्षाचीही बैठक पार पडली. या बैठकीत पक्षनेतेपदी नीतीशकुमार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नीतीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा सादर केला. यादरम्यान, 126 आमदारांच्या समर्थनाचं पत्र त्यांनी राज्यपालांकडे सोपवले. त्यांच्यासोबत बिहार भाजप अध्यक्ष संजय जयस्वाल, माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे अध्यक्ष जीतनराम मांझी, व्हीआयपी पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहनी हेदेखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार मोदी यंदा बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशील कुमार मोदींना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. बिहारच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा एकदा नीतीश कुमार यांच्या खांद्यावर देण्यात आली असून, त्यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या वेळीच्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपने जेडीयूपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. याच कारणामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपचा बोलबाल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नियमांनुसार, बिहारच्या विधानसभा जागांनुसार, जवळपास 36 मंत्री निवडण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 74 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपने 21 जागा जास्त जिंकल्या आहेत. तसेच जेडीयूच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत गेल्या वेळीच्या तुलनेत घट झाली असून, यंदा जेडीयूला 43 जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे विरोध पक्षांकडून अद्यापही नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. बिहारच्या जनतेने बदल घडवून आणण्यासाठी मतदान केले आहे. त्यामुळे नीतीश कुमार यांनी जनतेच्या आदेशाचा सन्मान करावा, असे आवाहन राष्ट्रीय जनता दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

भाजपात उपमुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच!

एनडीएच्या बैठकीत नेता म्हणून माझी निवड करण्यात आली. त्यानंतर आम्ही राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा केला. सोमवारी सायंकाळी चार वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती नीतीशकुमार यांनी दिली. राज्यात पर्यवेक्षक म्हणून आलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना बिहार उपमुख्यमंत्री पदाबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला. यावेळी, योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना माहीत होईलच. उपमुख्यमंत्री आम्ही सगळे मिळून निश्‍चित करू. सगळी माहिती थोड्याच वेळात समोर येईल, असे राजनाथ सिंह म्हणाले. बिहारचे याअगोदरचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, प्रेमकुमार, कामेश्‍वर चौपाल हे तिघांत उपमुख्यमंत्री पदाची रस्सीखेच सुरू आहे.