राहुरी/शहर प्रतिनिधी ः वांबोरीकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या वांबोरी नगर या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल त्यास...
राहुरी/शहर प्रतिनिधी ः वांबोरीकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या वांबोरी नगर या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल त्यासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात येईल असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
वांबोरी येथील पोटे वस्ती येथे ना. तनपुरे यांच्या विशेष निधीतून 25 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबा भिटे होते. यावेळी माजी सरपंच नितीन बाफना माजी सरपंच किसन जवरे, पोपटराव देवकर, बंटी मोरे, कान्हू मोरे, गोरख वेताळ आदि प्रमुख उपस्थित होते.
तनपुरे आपल्या भाषणात म्हणाले की, कोरोना महामारी मुळे राज्याचे व देशाचे आर्थिक गणित बिघडले आहे. विकासकामांचा निधी कमी कमी होत गेल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही रस्त्यांसह इतर विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जी कामे मार्गी लागली, दर्जेदार व्हावे अन्यथा अधिकार्यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा राज्याचे नामदार तनपुरे यांनी दिला. वांबोरी गावावर व पंचक्रोशीवर माझे विशेष प्रेम असून जास्तीत जास्त निधी विकास कामांसाठी या गावाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही त्यांनी सांगितले. वांबोरी परिसरातील व गावातील शेतकर्यांची दिवसा वीज देण्याची मागणी आहे. त्याबाबत शासनाचे नवीन कृषी विषयक धोरणात याबाबत निर्णय घेण्यात येणार असून वांबोरी गटातील खडांबे येथे वीज उपकेंद्राचे काम सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी पोटे वस्ती येथील नागरिकांना गेल्या 6 महिन्यापासून पिण्यासाठी पाणी ही मिळत नसून या भागातील नागरिकांनी वास्तविक पाणीपट्टी आगाऊ भरलेली आहे. केवळ राजकीय दबावामुळे हे काम होत नसल्याचा आरोप भिटे यांनी केला. 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सदर वस्तीस 8 ते 15 दिवसात पाणी देण्याबाबत ग्रामसेवक प्रशासक यांना सूचना कराव्यात. वांबोरी चारीचे फेज टू मधून पोटे वस्ती भागातील तलावाला पाणी देण्यासाठी नियोजन करण्याची मागणी केली.