Breaking News

अर्णव गोस्वामींच्या चौकशीला हिरवा कंदील

- अलिबाग सत्र न्यायालयाचा पोलिसांना दिलासा

- न्यायालयीन कोठडीतच होणार चौकशी

- जामिनासाठी अर्णव गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात


अलिबाग/ प्रतिनिधी 

मराठी उद्योगपती व वास्तूसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवला. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले असून, तिथेच दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिली. दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर अर्णव गोस्वामी हे जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने पोलिसांच्या मागणीनंतर दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी रायगड पोलिसांना दिली. दरम्यान, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे सत्र न्यायालयात अर्ज दाखल करतानाच अर्णव यांनी सर्वोच्च न्यायालयातदेखील जामिनासाठी धाव घेतली आहे. अर्णव यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शनिवारी (7 नोव्हेंबर) संपली. त्यावेळी सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने आता या वेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. आम्ही अर्णव यांच्या अर्जावरील निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तातडीचा दिलासा न देताच याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले होते.

------------------------