Breaking News

बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी श्रीरामपुरातून एकास उचलले

 - नागपूर पोलिसांची नगर व औरंगाबाद जिल्ह्यात मोठी कारवाई

नागपूर/ प्रतिनिधी

बहुचर्चित बोगस क्रीडा प्रमाणपत्रप्रकरणी नागपूर-मानकापूर पोलिसांची राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी नगर, औरंगाबाद जिल्ह्यात मोठी कारवाई करत श्रीरामपुरातून एकास उचलले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथून रमेश गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल. गाडे याच्या घरी अनेक बोगस कागदपत्रे सापडली आहेत. ट्रॅपोलिन, आईस हॉकी पाठोपाठ नेटबॉल, कराटे, किक बॉक्सिंगची बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा त्यात समावेश आहे. गाडे याने पुणे, नाशिक,  औरंगाबाद येथे अनेक बनावट प्रमाणपत्र विकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना चौकशीत मिळाली आहे. दुसरीकडे, या प्रकरणी औरंगाबाद शहरातील कॅनॉट गार्डन परिसरात कारवाई करण्यात आली. एका झेरॉक्स सेंटरमधून पोलिसांनी दोन संगणक जप्त केले आहेत. मानकापूर पोलिसांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली. श्रीरामपुरातील रमेश गाडे (वय 30) हा राहुरी कृषी विद्यापीठात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. बनावट क्रीडा प्रमाणपत्रांची विक्री करणार्‍या रॅकेटमध्ये तो सहभागी झाला. राहुरी कृषी विद्यापीठात काम करताना आरोपी गाडे याने बनावट क्रीडा प्रमाणपत्र विक्रीचा बाजार मांडून लाखो रुपयांची अवैध कमाई केली. तपासात त्याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांनी अहमदनगर गाठून टाकळी वहान (ता. श्रीरामपूर) येथून आरोपीला अटक केली. यावेळी मारलेल्या छाप्यात पोलिसांनी त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे, आधार कार्ड आणि पाच क्रीडा प्रकारातील बनावट प्रमाणपत्र जप्त केली आहेत. दरम्यान, बनावट क्रीडा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अंकुश राठोड याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बनावट क्रीडा प्रमाणपत्र विकत घेऊन आतापर्यंत 32 जणांनी शासकीय नोकर्‍या मिळवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.