Breaking News

शहरात युवकाची आत्महत्या

 

मालवण : 

मालवण शहरातील देऊळवाडा येथील राहुल पंढरीनाथ माणगावकर (25) या युवकाने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना सकाळी देऊनही पोलीस तब्बल साडे तीन तासांनी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.

राहुल माणगावकर हा मालवणातील काही खासगी गाड्यांवर चालक म्हणून कामाला जात असे. देऊळवाडा येथे तो आपल्या आजी समवेत राहत होता. आज सकाळी तो आपल्या मित्रासमवेत रुग्ण घेऊन गोव्याला जाणार होता. त्याची कल्पना त्याने आपल्या मालवणातील नातेवाईकांना दिली होती.

सकाळी उठल्यानंतर त्याने आपल्या मालवणातील बहीण आणि भावोजीला फोन लावला होता. त्याचा फोन कट झाल्याने भावोजीने त्याला पुन्हा फोन केला असता तो राहुलने उचलला नाही. त्यामुळे भावजीनी घरी धाव घेतली. त्यावेळी राहुल यांने खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावल्याचे दिसून आले. याबाबत माहिती मिळताच राहुल याच्या मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, बाळू नाटेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, नरळे, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, सिद्धेश चिपकर यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. राहुल याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आजी, पाच विवाहित बहिणी, चुलत काका, काकी असा परिवार आहे.