Breaking News

अमेरिकेने लागू केली रात्रीची 'संचारबंदी'

 


साक्रामेन्टो - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांतील बहुतांश लोकांसाठी रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियात करोनाचा प्रसार पुन्हा वाढीला लागल्याने ही उपाय योजना तिकडे केली गेली आहे.

त्यामुळे रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत लोकांना आता घराच्या बाहेर पडता येणार नाही. ही संचारबंदी 21 डिसेंबर पर्यंत लागू असणार आहे. त्यानंतर करोनाच्या प्रसाराची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कॅलिफोर्निच्या सुमारे 94 टक्के भागात ही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या राज्यात करोना प्रसार सर्वात अधिक वेगाने पुन्हा पसरत आहे. रात्रीच्यावेळी लागू करण्यात आलेल्या संचार बंदी मुळे अनावश्‍यक कार्यक्रमांना गर्दी करणाऱ्या लोकांवर चांगलीच बंधने येणार आहेत.

रात्री हॉटेलांमध्ये पार्ट्या करणे वगैरे प्रकारालाही यातून आळा बसेल आणि करोनाचा प्रसार टाळता येईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कॅलिफोर्नियातील करोना नियंत्रणात आला नाहीं तर यापेक्षाही अधिक निर्बंध लागू करावे लागतील असा इशारा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.