नवी दिल्ली : उत्तर भारताबरोबरच राजधानी दिल्लीतील अनेक ठिकाणचे तापमान चांगलेच घसरले आहे. दिल्लीमध्ये यंदा पडलेल्या थंडीने मागील १७ वर्षातील...
नवी दिल्ली :
उत्तर भारताबरोबरच राजधानी दिल्लीतील अनेक ठिकाणचे तापमान चांगलेच घसरले आहे. दिल्लीमध्ये यंदा पडलेल्या थंडीने मागील १७ वर्षातील सर्व विक्रम मोडले आहे. दिल्लीमध्ये सोमवारी किमान तापमान ६.३ डिग्री सेल्सियस इतकं होतं. २००३ नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत एवढ्या कमी तापामानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये आज (मंगळवारी) किमान तापमान ७ डिग्री सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीच्या बाबतीत यंदा दिल्लीची तुलना थेट शिमला आणि मनाली सारख्या थंड हवेच्या ठिकाणांशी होत आहे. या लोकप्रिय पर्यटनस्थळांवरील तापमानामध्ये आणि दिल्लीतील तापमानात फारसा फरक नाहीय.
उत्तरेकडील डोंगराळ भागांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडी वाढली आहे. जम्मू-काश्मीरमधील जवळजवळ सर्वच भागांमध्ये काल मौसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. त्यामुळेच दिल्लीही गारठली. सामान्यपणे ११ डिग्रीच्या आसपास असणारे तापमान पाच अंशांनी घसरले. मंगळवारीही सकाळी दिल्लीवर धुक्याची चादर होती आणि सूर्याचे दर्शन होण्यासाठी जवळजवळ अर्धा दिवस जावा लागला.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार डोंगराळ भागामध्ये झालेली बर्फवृष्टी आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दिल्लीत होणाऱ्या पावसामुळे थंडी आणखीन वाढली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार २४ आणि २५ नोव्हेंबरलाही दिल्ली आणि परिसरावर पावसाचे सावट असेल. तसेच २६ नोव्हेंबर रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ नोव्हेंबरपासून थंडी थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल असं हवामानखात्याचं म्हणणं आहे. दिल्लीमध्ये मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वात कमी तापमान हे ११.५ डिग्री सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलेलं. २०१८ मध्ये १०.५ तर २०१७ मध्ये ७.६ डिग्री तापमानाची नोंद झालेली. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान १९३८ साली नोंदवण्यात आलेलं. त्या वर्षी २८ नोव्हेंबरमध्ये दिल्लीचा पारा ३.९ डिग्रीपर्यंत घसरला होता.
हरयाणामधील हिसार येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. हिसारमध्ये पारा ५.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. तर पंजाबमधील भटींडामध्ये किमान तापमान ५.6 डिग्री सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं. राजस्थानमधील एकमेव थंड हवेचे ठिकाण असणार्या माउंट आबूमध्ये पारा शून्याच्या खाली गेला.